
सावंतवाडी : तालुक्यातील कारिवडे केगद येथे नदीलगत असलेल्या शेतात कामासाठी गेलेल्या एका माजी सैनिकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. संदिप बाबाजी आमुणेकर (वय ५०, रा. कारीवडे गावठणवाडी) असे त्यांचे नाव आहे. ते कारिवडे गावचे उपसरपंच तुकाराम आमुणेकर यांचे बंधू होते.
संदिप आमुणेकर हे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कारीवडे केगद येथील नदीच्या काठावर असलेल्या आपल्या शेतात कामासाठी गेले होते. दुपारच्या जेवणाची वेळ झाली तरी ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली.
त्यांचा भाऊ सुशील आमुणेकर हे त्यांना बघण्यासाठी शेताकडे गेले असता, त्यांना संदिप यांचा मृतदेह नदीच्या पाण्यात तरंगताना दिसला. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.
संदिप आमुणेकर हे शेतातील काम आटोपून नदीकिनारी हातपाय धुवत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले असावेत व दुर्दैवाने त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस हवालदार संतोष गलोले यांच्यासह पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
या दुर्दैवी घटनेची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
संदीप यांनी सैन्य दलातील सेवेनंतर पुणे येथे एक हॉटेल चालवायला घेतले होते. तेथेच ते आपल्या पत्नी व मुलांसह राहत होते. काही दिवसांपूर्वी ते कारिवडे येथील आपल्या गावी आले होते. आजच मंगळवारी सायंकाळी ते पुणे येथे परत जाणार होते. मात्र तत्पूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
मृत संदीप यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, दोन भाऊ, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक व दुर्दैवी निधनामुळे आमुणेकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर कारिवडे गावातही शोककळा पसरली आहे.