नियोजनबद्ध सोहळ्याबद्दल सुधाकर राणे यांनी मानकरी - निगुडे ग्रामस्थांचे मानले आभार

गावच्या विकासासाठीही अशाच एकजूटीची इच्छा केली व्यक्त
Edited by:
Published on: February 09, 2025 19:29 PM
views 219  views

बांदा : निगुडेतील श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवतांचा पुनःप्रतिष्ठापना सोहळा तसेच शिखर कलशारोहण सोहळा श्री मठसंस्थान दाभोली पिठाधीश श्रीमद दत्तानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या हस्ते मोठ्या उत्सहात आणि भक्तीमय वातावरणात ७ फेब्रुवारीला संपन्न झाला. हा सोहळा नियोजनबद्ध होण्यासाठी गावचे ग्रामस्थ मानकरी दिवसरात्र मेहनत घेत होते. 

या, सोहळ्या दिवशी निगुडे गावचे सुपुत्र सुधाकर तातोबा राणे यांचा खास सन्मान करण्यात आला. या सन्मानानिमित्त बोलताना ते म्हणाले, या पुनःप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी जे केलं तो माझा छोटासा खारीचा वाटा होता. गावचा ग्रामस्थ म्हणून ते माझे कर्तव्य होते. त्यासाठी सन्मानाची गरज नव्हती. इच्छा असूनही या कार्यक्रमाच्या तयारीसाठी श्रमदान करू न शकल्याची खंत सुधाकर राणे यांनी व्यक्त केली.  आपला केलेला सन्मान तसेच या कार्यक्रमाच्या सुंदर आणि नियोजनबद्ध आयोजनाबद्दल राणे यांनी मानकरी आणि ग्रामस्थांचे आभारही व्यक्त केले.


दरम्यान, पुनःप्रतिष्ठापना सोहळा तसेच शिखर कलशारोहण सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट कौतुकास्पद असून गावच्या विकासासाठी सर्वांनी मतभेद विसरून अशीच एकी दाखवावी जेणेकरून गावाचा चेहरा मोहरा बदलेलं अशी इच्छाही राणे यांनी व्यक्त केली.