देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल

मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांचं प्रतिपादन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 27, 2025 16:34 PM
views 1180  views

पालघर : वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊन म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

वाढवण बंदराच्या विकास प्रकल्पाची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय,  येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री . राणे बोलत होते. या बैठकीस आ.राजेंद्र गावित,आ.विलास तरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदिप, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील, आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री.राणे पुढे म्हणाले, वाढवण बंदरामध्ये महाराष्ट्र शासनाचा 26 टक्के वाटा आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार मिळावा  यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाचा केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले. 

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्यामार्फत स्थानिकांना विविध क्षेत्रातील कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

वाढवण बंदरामुळे मोठा रोजगार निर्माण होणार आहे तो पालघर जिल्हयातील स्थानिकांना मिळायला पाहिजे. स्थानिक मच्छिमारांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांची भावी पिढी या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभी राहिल व आर्थिक सक्षम होइल. त्याबाबत संबंधितांना प्रशिक्षण देऊन वाढवण बंदराच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचा विकास आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार असून  यासाठी प्रकल्प उभारणीच्या कामात संबंधित अधिकारी यांनी जलदगतीने काम करावे, अशा सूचना मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

बंदर विकास विभागा मार्फत होणारी गुंतवणूक व त्याची परिस्थिती काय आहे. प्रकल्पाची कामे कुठपर्यंत आली आहेत. याचा आढावा श्री . राणे यांनी घेतला.