भजनी मंडळांना साहित्य संच पुरवणे योजनेची व्याप्ती वाढवा

मनसेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 06, 2023 16:46 PM
views 93  views

ओरोस : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग स्वनिधी योजनेंतर्गत ग्रामिण भागातील भजनी मंडळांना भजनी साहित्य संच पुरवणे योजनेची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त मंडळाना लाभ दिला जावा किमान एक कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करावी अशी मागणी मनसे शिष्टमंडळाने जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर,कुडाळ माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी,सेनेचे जिल्हाअध्यक्ष आशिष सुभेदार,विनोद सांडव,प्रतिक कुबल,रस्ते आस्थापना जिल्हासंघटक अमोल जंगले, उपजिल्हाअध्यक्ष प्रतीक कुबल, राजेश टंगसाळी,आपा मांजरेकर,मंदार नाईक, संदीप लाड, वैभव धुरी, नंदू परब, नीलेश देसाई विजय जांभळे, कुणाल चोढनेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते


मनसे शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, भजनी साहित्य योजनेच्या लाभासाठी पंचायत समित्यांकडील प्राप्त माहितीनुसार  ग्रामस्तरावरून जवळपास ३ हजारहून अधिक भजनी मंडळांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले आहेत. जिल्ह्यात भजनाच्या माध्यमातून वाडी वाडीतील ग्रामस्थांमध्ये होणारी एकजूट व त्यातून चालणारे परमेश्वराचे नामस्मरण हा जिल्हावासीयांसाठी मोठ्या आस्थेचा भाग असून जिल्हा परिषदेकडून भजनी मंडळांना साहित्य उपलब्ध करून देत गावोगावच्या मंडळांना चालना देण्याच्या या योजनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वागत केले आहे.


 तर या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत २५ लाख निधीची तरतूद होवून पहिल्या टप्प्यात फक्त २०० मंडळांना लाभ दिला जाणार असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. या योजनेसाठी प्रथम टप्प्यात किमान १ कोटी रुपये निधी प्रशासकीय मंजुरी मिळून किमान ७०० ते ८०० मंडळांना लाभ देण्यात यावा अशी मनसेने आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये एकीकडे जिल्हा परिषद इमारत छप्पर दुरुस्ती कामकाजासाठी अनावश्यक सव्वा कोटी रुपये तरतूद होवू शकते तर दुसरीकडे जिल्हावासीयांच्या या सर्व समावेशक व आस्थारूपी योजनेसाठी अधिकच्या निधीची तरतूद का होवू शकत नाही असा प्रश्न उपस्थित करत तरतूद केलेल्या निधीबाबत पुनर्विचार होवून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त भजनी मंडळांना गणेश चतुर्थीपूर्वी  देण्याची मागणी मनसे शिष्टमंडळाने केली आहे.