नेटवर्क नसल्याने थेट झाडावरच्या माचावर परीक्षा

केंद्रप्रमुखांचे SCERT पुणेकडून कौतुक
Edited by: मनोज पवार
Published on: September 13, 2025 20:07 PM
views 46  views

माखजन : दुर्दम्य इच्छा शक्ती असेल तर प्रत्येक समस्येवर मार्ग काढू शकतो हे खर! रत्नागिरी जिल्ह्याच्या  संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे गावामध्ये इंटरनेट ,मोबाईल सेवा येत नसल्याने, जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुले निपुण भारत ची परीक्षा देण्यापासून वंचित राहत होती.ही बाब केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शक्कल लढवत थेट मुलांची परीक्षा झाडावर बांधलेल्या माचावर घेऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.

 अशक्य ते शक्य केल्याने दत्ताराम गोताड यांच्या या कृतीचे कौतुक नुसते केंद्रात,तालुक्यात, जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता याची दखल थेट स्टेट कौन्सील ऑफ इज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात SCERT पुणे यांनी घेतली व दत्ताराम गोताड यांच्या कृतीचे कौतुक व अभिनंदन केले.

याविषयी सविस्तरवृत्त असे की, नारडुवे सडे  वाडी शाळेत मोबाईल ला नेटवर्क नाही व ही परीक्षा दुसऱ्या गावात जाऊन देण्यासाठी,गावाबाहेर मुलांना पाठवायला पालक तयार नाहीत.अशी स्थिती असताना या ग्रामीण भागात, माखजन, धामापूर,कासे केंद्राचे केंद्रप्रमुख असलेले दत्ताराम लक्ष्मण गोताड हे शाळेत पोहचले. विद्यार्थ्यांशी संवाद साधला..काहीही झाल तरी निपुण भारतची ऑनलाईन परीक्षा द्यायची विद्यार्थ्यांची तीव्र इच्छा आणि काहीही झाल तरी विद्यार्थ्यांना वंचित ठेवायचं नाही हा केंद्रप्रमुखांचा संकल्प.देवाने हा संकल्प पुरा करायला मदत केली अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संकल्प आणी सिद्धी यामध्ये परमेश्वरी इच्छा उभी असते असे राम गणेश गडकरी यांनी एका नाटकात म्हटलंय, ते खर!

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सदानंद जोगळे नावाच्या विद्यार्थ्याने भीत भीत विचारले.. साहेब ,तुम्हाला झाडावर चढता येत का? ५५ वर्षांच्या केंद्रप्रमुखांनी पटकन हो म्हटलं. विद्यार्थी म्हणाला मग साहेब सोप्प आहे. डोंगरात एका ठिकाणी झाडावर माचण बांधलेली आहे. त्या माचावर मोबाईलला रेंज येते. तिथे कॉलेजची पोर बसतात. केंद्रप्रमुखांनी विचार केला. आपण या मुलांना तिथे घेऊन गेलो तर! लगेच केंद्रप्रमुख व सात विद्यार्थ्यांना घेऊन पायपीट करून माचा पर्यंत पोहचले. मुलांना एक एक करून वर चढवून स्वतः माचावर पोहचले. मोबाईल नेटवर्क आल्याने विदयार्थ्यांच्या आणि पर्यायाने केंद्रप्रमुखांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर आली. निपुण भारत ची परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली व विद्यार्थी यशस्वी झाले." प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे" या म्हणीचा प्रत्यय मुलांना आला. माचावर पोहचल्या पोहचल्या पहिल्यांदा केंद्रप्रमुख यांनी सदानंद जोगळे याची सर्वप्रथम परीक्षा घेतली व त्याने सर्व स्तर प्राप्त केले. सर्वच विद्यार्थी यशस्वी झाल्याने ५५ वर्षांमध्ये आलेला सर्वोत्तम अनुभव असल्याचे केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांनी सांगितले. 

जवळच्या चार झाडावर उंचावर बांबूच्या सहाय्याने माचण बांधली जाते. वरती बसण्यासाठी कामट्या वापरून माच केला जातो. या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना माचावर चढण्यासाठी शिडी लावण्यात आली होती.

तू चाल पुढं,तुला रं गड्या, भिती कशाची अस म्हणत विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेऊन धीर देणारे शिक्षक, केंद्रप्रमुख, अधिकारी असतील तर विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही. हे मात्र खर! केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांचा आदर्श खर तर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी इतर सहकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.