
सावंतवाडी : मनुस्मृति म्हणजे स्त्रीयांना बंधनात अडकवून चूल आणि मूल यातच स्त्रीयांना बंदिस्त करून पारतंत्र्यातच ठेवण्यात आले होते .म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे प्रथम दहन करून स्त्रीला सर्वच बंधनातून मुक्त केले आणि प्रगतीचे स्वातंत्र्य मिळवून दिले.मात्र, ईव्हीएमच्या माध्यमातून देशात पुन्हा एकदा मनुस्मृती आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याने ईव्हीएम म्हणजेच आजची आधुनिक मनुस्मृती असल्याने स्त्रीयांनी स्वातंत्र्यासाठी ईव्हीएम हटाव मोहीम सुरू करावी असे आवाहन सत्यशीला बोर्डे यांनी येथे केले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडीच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात स्त्री मुक्ती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सत्यशिला बोर्डे प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका महिला अध्यक्षा मीनाक्षी तेंडुलकर ह्या होत्या.यावेळी तालुका अध्यक्ष विजय नेमळेकर, सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, सुनील जाधव, आर .जी चौकेकर, गौतमी कांबळे, अश्विनी जाधव, श्रद्धा असंनकर ,कविता निगुडकर, सविता जाधव, कांता जाधव ,दिलीप जाधव, एस व्ही कांबळे, मिलिंद नेमळेकर इत्यादी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत अश्विनी जाधव यांनी केले.
तर ममता जाधव यांनी प्रास्ताविकात मनुस्मृतीचे नाकारलेले स्त्रीयांचे अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच बाबासाहेबांनी प्रथम मनुस्मृतीचे दहन करून स्त्रीयांना सर्व क्षेत्रात स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळेच आज सर्व क्षेत्रात स्त्री भरारी घेत आहेत याचे श्रेय आजच्या स्त्रीमुक्ती दिनाला असल्याचे सांगून स्पष्ट केले. यावेळी कांता जाधव, परेश जाधव, चंद्रशेखर जाधव इत्यादींनी शुभेच्छा दिल्या. तर प्रमुख मार्गदर्शक सत्यशीला बोर्डे यांनी स्त्री मुक्ती दिन म्हणजे काय? मनुस्मृति म्हणजे काय ? हे स्पष्ट करून मनुस्मृतिदिनी स्त्रीयांची असलेली अफाट उपस्थिती व त्या उपस्थितीत कशा पद्धतीने हा कार्यक्रम करण्यात आला हे त्यांनी स्पष्ट केले. ज्या मनुस्मृतीने शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना नाकारला होता जाचक अटी घालून स्त्रियांना बंधनात अडकवण्यात आल्या होत्या. त्यातूनच स्त्रियांची मुक्तता करण्यासाठी बाबासाहेबांनी हे क्रांतिकारक पाऊल उचलल्याने स्त्री आज मुक्त संचार करत आहे हे स्पष्ट केले.
तर अध्यक्षपदावरून बोलताना मीनाक्षी तेंडुलकर यांनी येणारा काळ हा मनुस्मृतीचा काळ असू शकेल का अशी भीती व्यक्त करून क्रांती घडविताना प्रतिक्रांतीची बीजे रोवली जातात हे स्पष्ट केले. बौद्ध धर्मच येणाऱ्या काळात जगावर राज्य करेल असे त्यांनी सांगून धम्माचे सर्वांनी कास धरावी असे आवाहन केले शेवटी सुनील जाधव यांनी आभार मानले.