प्रत्येक विद्यार्थ्याने आपले वेगळेपण जपले पाहिजे! - संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे

वैभववाडीत एसएससी मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 01, 2023 12:14 PM
views 197  views

वैभववाडी: 'विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत करून यश संपादन केले पाहिजे. वर्षभर केलेल्या अभ्यासानुसार परीक्षेला सामोरे जावे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले वेगळेपण जपले पाहिजे. आपल्या उच्च शिक्षणासाठी आपल्या पालकांना आर्थिक खर्च करायला लागणार नाही, असे उज्वल यश आपण संपादन करावे, तालुक्यासह जिल्ह्यात प्रथम, द्वितीय, तृतीय व अन्य क्रमांकही मिळवावे, असे आवाहन वैभववाडी तालुका शिक्षण संस्था अधीक्षक तथा स्थानिक समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले.

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल, वैभववाडी येथे एसएससी मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी जयेंद्र रावराणे बोलत होते.

   रावराणे पुढे म्हणाले, विद्यार्थी दशेत अभ्यासाला फार मेहनत आहे. या काळात घेतलेली मेहनत भविष्यकाळ सुखकर करेल. त्यासाठी आजच श्रम घ्या, असे आवाहन रावराणे यांनी केले.  या कार्यक्रम प्रसंगी सानिका गुरव, अंकिता लसणे, सिद्धी सावंत, दीपराज झोरे, दुर्वांक चव्हाण, साक्षी भोसले, प्रिया बोडेकर, वेदांत पाटील यांनी गत शैक्षणिक काळातील आपले अध्ययन अनुभव कथन केले व चांगल्या गुणांनी आम्ही सर्वजण उत्तीर्ण होऊ, असे अभिवचन उपस्थित शिक्षक वर्गाला दिले.

 'विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास त्यांना यशाकडे घेऊन जाणार आहे, असे मत क्रीडाशिक्षक संदेश तुळसणकर यांनी व्यक्त केले. यानंतर प्रशालेच्या पी. एन. भोवड, ए. एस.परीट, वाय. जी. चव्हाण, आर. एम. फुटक या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी भोसले हिने केले तर प्रास्ताविक एस. बी. शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन पी. पी. सावंत यांनी केले. या कार्यक्रमाला संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, माध्यमिक विभाग प्रमुख एस. एस. पाटील, दहावीचे वर्ग शिक्षक एस. बी. शिंदे, एस. व्ही. भोसले, तसेच सांस्कृतिक विभागप्रमुख वाय. जी. चव्हाण, एम. एस. चोरगे, व शिक्षक पी. बी. पवार, ए. जी. केळकर, एस. ए. सबनीस, ग्रंथपाल आर. जे. पवार, पी. पी. साखरपेकर आदी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.