वीजपुरवठा सुरळीत नाही तोपर्यंत बीलेही भरणार नाहीत

वीजेच्या खेळखंडोब्यामुळे तांबुळीवासिय आक्रमक
Edited by: विनायक गावस
Published on: July 24, 2023 16:53 PM
views 264  views

बांदा : रोजच्या वीज समस्यांनी त्रस्त झालेल्या तांबुळी ग्रामस्थांनी सरपंच विशाखा नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज बांदा वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र, तत्पूर्वीच सहाय्यक अभियंता अनिल यादव यांनी कार्यालयातून पलायन केले. गेले महिनाभर वीजपुरवठा गायब असतानाही महावितरण कडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत संपूर्ण गावातून वीज बीले न भरण्याचा निर्धार करण्यात आला. संतप्त ग्रामस्थांच्या प्रश्नांसमोर सहाय्यक अभियंता एस. ए. कोहळे निरुत्तर झाले.  

       तांबुळी ग्रामस्थांनी खंडीत वीजपुरवठा प्रश्नावरुन आज बांदा महावितरण कार्यालय दणाणून सोडले. पूर्वकल्पना देऊनही अभियंता अनिल यादव उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. थातूरमातूर व विसंगत माहिती देणार्‍या अभियंता कोहळे यांच्यावर संतप्त ग्रामस्थांनी समस्यांची सरबत्ती केली. ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांची भंबेरी उडताना दिसत होती.

     मेन लाईन नादुरुस्त असल्याचे कारण सातत्याने पुढे केले जाते. मात्र, लाईनवरील झुडपांची सफाई करण्याबाबत एप्रिल व मे महिन्यात कार्यवाही केली जात नसल्यानेच वीज समस्या उद्भवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. केवळ भरमसाठ बीले आकारली जातात. विविध सर्व्हीस चार्जेस आकारले जातात. मात्र प्रत्यक्षात कोणतीही सर्व्हीस पुरविली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. अभियंता अनिल यादव बिनकामाचे असून त्यांची तातडीने बदली करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.

      यावेळी तांबुळी सरपंच वेदिका नाईक, मिलिंद देसाई, बाबली सावंत, नाना सावंत, गणेश सावंत, नितीन सावंत, मुन्ना गावडे, दिलीप सावंत, उत्तम सावंत, मित्तल देसाई, वसंत सावंत, शुभम पोपकर, उमेश सावंत, बाबू सावंत, विलास नाईक, रवींद्र देसाई आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.