
वेळणेश्वर - गुहागर : विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचलित, गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. दि.२७ मार्च २०२५ रोजी या कार्यक्रमाचे अनावरण उत्साहात पार पडले. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील सन २०१८ बॅचचे माजी विद्यार्थी व स्टॅकलॅबचे सह-संस्थापक श्री. सुयश वाघाटे उपस्थित होते.
संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. केतन कुंडिया यांनी विद्यार्थी संघाच्या उद्दिष्टे विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, उद्योग आणि शैक्षणिक ज्ञान यामधील दरी भरून काढणे तसेच तंत्रज्ञानधारित सामाजिक प्रकल्पांमध्ये सहभाग वाढवून नेतृत्वगुण आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करणे यासाठी संगणक अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. सोबत प्रमुख पाहुणे श्री. सुयश वाघाटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उद्योजकतेचा प्रवास कसा असतो याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी उद्योग क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि विद्यार्थ्यांनी करियर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्ये यावर भर दिला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्रकुमार सोनी, उपप्राचार्य प्रा.अविनाश पवार, महाविद्यालयाचे नॅक समितीसमन्वयक डॉ. संतोष चतुर्भुज हे यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा. राधिका कदम आणि प्रा. कृष्णा मालठणकर यांनी केले.