
वेंगुर्ला : हिंदी दिवस (१४ सप्टेंबर) आणि हिंदी पखवड्यानिमित्त युवक आणि खेळ मंत्रालय भारत सरकारच्या मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग तसेच वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी हिंदी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ले येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता पार पडणार आहे.
या स्पर्धेमुळे युवक-युवतींना हिंदी भाषेत आपली मते मांडण्याची, लेखन कौशल्य वृद्धिंगत करण्याची तसेच जागतिक स्तरावर हिंदीचे महत्त्व समजून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
स्पर्धकांनी खालीलपैकी एका विषयावर कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून निबंध किमान ७०० शब्दात लेखन करायचे आहे :
1. वैश्विक परिदृश्य में हिंदी भाषा का महत्व
2. डिजिटल युग और हिंदी का भविष्य
3. हिंदी और भारतीय युवा पीढ़ी
4. रोजगार और व्यावसायिक क्षेत्र में हिंदी की भूमिका
5. सोशल मीडिया के युग में हिंदी भाषा की स्थिती
या स्पर्धेत प्रथम पाच क्रमांक मिळविणाऱ्या विजेत्या युवक-युवतींना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या उपक्रमाद्वारे युवक-युवतींमध्ये हिंदी भाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे, राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे तसेच हिंदीला केवळ संवादाची नव्हे तर ज्ञान, रोजगार आणि तंत्रज्ञानाची भाषा म्हणून प्रतिष्ठा मिळवून देणे हा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी वेताळ प्रतिष्ठान चे सचिव डॉ. सचिन परुळकर (मो. ९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग चे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी केले आहे.










