
वैभववाडी : नव्या शैक्षणिक वर्षांची सोमवारी (ता.१६)पासून सुरुवात झाली. यावेळी पहील्या दिवशी अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलमध्ये नवागतांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी नवागतांचे स्वागत केले.
उन्हाळ्याच्या प्रदिर्घ सुट्टी नंतर आज राज्यात शाळा पुन्हा गजबजल्या. आजच्या पहील्या दिवशी सर्वत्र नवागतांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. येथील अर्जुन रावराणे विद्यालयात हा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न झाला. सर्व विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. नवागतांचे संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.