'हातभार चॅरिटेबल ट्रस्ट' च्या 'नेत्र तपासणी' शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शुभांगी ऑप्टिक्सचाही सहभाग
Edited by: विनायक गावस
Published on: June 22, 2023 15:03 PM
views 94  views

 वेंगुर्ला : येथील रा कृ पाटकर हायस्कुमध्ये 'हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग' या संस्थेच्या वतीने बुधवार दि २१ जून २०२३ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत येथील विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी 'नेत्र तपासणी' शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव, मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, हातभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर, वासुदेव गावडे, एकनाथ चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजय पिळणकर, जिल्हासचिव यश माधव, 'शुभांगी ऑप्टिक्स' चे सचिन हरमलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष कंकाळ यांनी शिबिरास भेट देऊन "हातभार चॅरिटेबल ट्रस्ट" च्या या उपक्रमाचे कौतुक करून संस्थेला नगरपरिषदेच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

    कोविडच्या जागतिक महामारीत सर्वच व्यवस्था बंद होत्या. त्यात शाळा - कॉलेजही बंद होती,त्यावेळी ऑनलाईन शिक्षणामुळे नाईलाजाने  विद्यार्थ्यांना मोबाईल देणे पालकांना बंधनकारक झाले. याचा दूरगामी परिणाम मुलांच्या डोळ्यावर होऊ शकतो,नेमकी हीच बाब विचारात घेऊन 'हातभार चॅरिटेबल ट्रस्ट' सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून 'योग दिवस' चे औचित्य साधून पाटकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची मोफत 'नेत्र तपासणी' करून 'हातभार चॅरिटेबल ट्रस्ट' ने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न वेंगुर्ला तालुक्यात प्रथमच केला. या स्तुत्य उपक्रमाला पाटकर हायस्कुलच्या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

यापुढेही सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील २ हजारहुन अधिक विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष संजय पिळणकर व संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर यांनी दिले. तर हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष संजय पिळणकर यांचे "मिशन २०००" ला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन "शुभांगी ऑप्टिक्स" च्यावतीने सचिन हरमलकर यांनी दिले.

    यावेळी हातभार संस्थेचे वेंगुर्ला संपर्क प्रमुख प्रतीक खानोलकर, महिला संघटक अस्मिता भराडी, निखिल भराडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपक्रमशील शिक्षक महेश बोवलेकर यांनी केले.