
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच कृतियुक्त अध्ययनातून नवीन, आनंददायी अध्ययन अनुभव घेण्यासाठी दिनांक 15 एप्रिल ते 25 एप्रिल 2025 पर्यंत विविध शैक्षणिक व ज्ञानरंजक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
यामध्ये चित्रकला, कोलाज, कागदकाम, पेंटिंग, मनोरंजक व पारंपारिक खेळ, डंबेल्स कवायत, फिंगर थम पेंटिंग, कराओकेच्या तालावर गायन, भाषा विषयक क्षमता वाढवणारे उपक्रम, विविध पुस्तकांचे वाचन, क्लासिकल डान्स, प्रथमोपचाराचे मार्गदर्शन, मैदानी खेळ, मानसिक एकाग्रता वाढवणारे खेळ इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सिया धोपेश्वर यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्याचे अनमोल मार्गदर्शन केले. तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी लक्षवेधी नृत्याविष्कार सादर केले. त्याचप्रमाणे कराओकेच्या तालावर सुश्राव्य गीत गायन प्रस्तुत केले. समारोप प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे जयप्रकाश सावंत, नृत्य विशारद नृत्यांगना श्रीमती सीया धोपेश्वर व प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सह शिक्षिका प्रेरणा भोसले यांनी केले. तसेच हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले व संस्थेचे सदस्य तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी प्रोत्साहित केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या