'संस्कार भारती'चा स्नेहमिलन सोहळा उत्साहात..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 17, 2023 11:25 AM
views 299  views

सावंतावडी : सिंधुदुर्ग जिल्हा कलेच्या क्षेत्रात हिरे माणकांनी भरलेला आहे. अनेक श्रेष्ठ कलाकार ह्या भूमीने भारताला आजतागायत दिले. हा कलेचा वारसा तसेच भारताचे संस्कार कलेच्या माध्यमातून सर्वदूर पसरवण्याचे महान कार्य "संस्कार भारती" च्या अखिल भारतीय संघटने तर्फे  "सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण प्रांत" ही नवीन शाखा ह्यापुढे करणार आहे.

" संस्कार भारती"  च्या सिंधुदुर्ग जिल्हा महामंत्री सौ. अनिता चव्हाण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार 10 सप्टेंबर रोजी कळसुळकर इंग्लिश हायस्कूल मध्ये "कलाकार व तंत्रज्ञ् ह्यांचा स्नेहमिलन सोहळा"  कलाकारांच्या प्रचंड उपस्थितीत उत्साहात पार पडला. 

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून ध्येयगीत,गुरु वंदना व गणेश वंदनेने यथासांग झाली. सोहळ्या साठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी कलाकारांना पाठिंबा दिला. संस्कार भारतीचे कोकण प्रांत मंत्री संजय गोडसे, सुरेंद्र कुलकर्णी व दिपक कदम ह्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

ह्या स्नेहमिलनात जिल्ह्याची कार्यकारिणी समिती स्थापन करण्यात आली. कुडाळस्थित वकील महेश कुंटे ह्यांची अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली तसेच सावंतवाडीच्या सौ. प्रतिमा सुकी ह्यांची कोषाध्यक्ष पदी नेमणूक झाली. तसेच सह-महामंत्री पद नित्यानंदजी परब ह्यांना सुपूर्त करण्यात आले. 

संस्कार भारतीच्या विविध शाखांच्या एकूण 7 विधा स्थापन करण्यात आल्या व संयोजकांची नेमणूक करण्यात आली. ज्यात नृत्य- सौ. स्नेहा नाईक , नाट्य- श्री. श्यामसुंदर नाडकर्णी , लोककला - श्री. श्रीकृष्ण गोरे, संगीत - श्री. संकेत म्हापणकर, चित्रकला - श्री. साईश वाडकर , साहित्य- सौ. संप्रवी कशाळीकर , भू-अलंकरण- श्री सागर आईर , ह्यांना सोपवण्यात आली.  प्रत्येक विधेचा पदभार सन्मानपूर्वक संयोजकांना व त्यांच्या सह संयोजकांना देण्यात आला. प्रत्येकाने स्वतःची थोडक्यात ओळख करून दिली.

कलाकारांनी कार्यक्रमात विविध रंगारंग कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सौ. संप्रवीताई कशाळीकर ह्यांनी प्रसंगावधान राखत उत्कृष्ट पद्धतीने केले. ह्या प्रसंगी "संस्कार भारती" च्या कार्याची थोडक्यात माहिती आलेल्या मान्यवर कोकण प्रांतमंत्र्यांनी अचूक करून दिली.संजय गोडसे ह्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देताना संस्थेचा इतिहास सांगून योग्य मार्गदर्शन केले तर सुरेंद्र कुलकर्णी ह्यांनी संस्थेचा संम्पूर्ण आढावा घेऊन कार्यकारिणी समिती पुढे कशी चालवायची ह्यासाठी मार्गदर्शन केले. चित्रपट क्षेत्रात डायरेक्टर म्हणून नावलौकिक मिळवलेले दिपक कदम हयांनी जिल्ह्यातील कलाकारांना सर्वतोपारी मदत करण्याचे आश्वासन दिले.

ह्या प्रसंगी अनिता चव्हाण यांनी केलेल्या प्रस्तावनेत सर्व मान्यवरांना व स्थानिक जनतेला कलाकारांना कायम स्वरूपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन केंद्रित असल्याने, पर्यटकांना कलेचा अविरत आस्वाद कधीही घेता येईल व कलाकारांना रोजगार संधी उपलब्ध होतील असा ह्या मागील उद्देश आहे.

कार्यक्रम दणक्यात पार पाडण्यासाठी स्थानिक जनतेने व मित्र परिवाराने प्रचंड उत्साहाने सर्वतोपरी मदत केली. सावंतवाडीचे रहिवासी राम वाडकर व डॉ. उदय भाट ह्यांनी महिनाभर प्रचंड मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पडतील ती कामे करून मोलाचा हातभार लावला. तसेच अनिल ठाकूर व सौ. वर्षा सापळे ह्यांनी कामाचा भार उचलून मदद केली.

कार्यक्रमासाठी आर्थिक सहाय्य मालवण, सावंतवाडी, कुडाळ येथील स्थानिक जनतेने तसेच SPK कॉलेज च्या "सुंदरवाडी" ग्रुप मधील काही मित्रमंडळींनी आनंदाने केले, त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित सादर करता आला. महेश कुंटे ह्यांनी शेवटी केलेल्या आभार प्रदर्शनपर भाषणात नावासहित सर्व मान्यवर, देणगीदार, कलाकार, तंत्रज्ञ् ह्यांचा उल्लेख करून आभार मानले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरमने झाली.