देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 13, 2024 13:33 PM
views 165  views

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत परिसरात कचऱ्याचे व दुर्गंधीची साम्राज्य पसरल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना चांगलेच धारेवर धरत या कचऱ्याचे करणार काय असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी भाजप नगरसेवकांनी घेतला आहे. देवगड जामसंडे नगरपंचायत होऊन सात वर्ष उलटली मात्र कचऱ्याचा प्रश्न अद्यापही सुटता सुटेना नगरपंचायत परिसरात कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड केल्यामुळे नगरपंचायत परिसरात दुर्गंधीची साम्राज्य पसरल्यामुळे अखेर भाजप कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना चांगलेच धारेवर धरत या कचऱ्याचे करणार काय असा सवाल उपस्थित केला आहे.

देवगड जामसंडे नगरपंचायत कचरा व्यवस्थापणामुळे नेहमीचं चर्चेत राहिली आहे .नगरपंचायत होऊन सात वर्षे पूर्ण झाली मात्र अद्यापही कायमस्वरूपी कचऱ्याचे व्यवस्थापन नगरपंचायत करू शकली नाही. नगरपंचायतीच्या कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न करता करता मागील सत्ताधारी व विद्यमान सत्ताधारी यांच्या नाकीनऊ आलेले दिसत आहेत.

डम्पिंग ग्राउंड नसल्याने नगरपंचायत प्रशासनाने चक्क नगरपंचायत कार्यालय परिसरातच कचरा डम्पिंग ग्राउंड केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. जवळपास महिनाभर नगरपंचायत कार्यालयाशेजारी देवगड जामसंडे शहराचा कचरा डम्पिंग करण्यात आला. त्यामुळे नगरपंचायत परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढला. गुरांचा वावर वाढल्याने डम्पिंग केलेला कचरा गुरांनी विस्कटून टाकल्याने नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊ लागला .

या संदर्भात नगराध्यक्ष साक्षी प्रभू व मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी दोन दिवसात कचरा उचलला जाईल अशी आश्वासन दिल्याने अखेर भाजपाने दोन दिवस वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दोन दिवसात येथील कचरा हलविण्यात आला नाही तर यापुढे आंदोलन सुरूच ठेवणार अशा शब्दात आपल्या तीव्र भावना भाजपा नगरसेवकांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे गटनेते शरद ठुकरूल माजी नगराध्यक्ष प्रियंका साळसकर, माजी नगराध्यक्ष योगेश चादोसकर, संजय तारकर उमेश कनेरकर नगरसेविका तन्वी चांदोसकर,स्वरा कावले, विश्वामित्र खडपकर शहराध्यक्ष दयानंद पाटील आदी उपस्थित होते.