आणीबाणी ही काँग्रेसने केलेली संविधानाची हत्या

माजी खा. नरेंद्र सावईकर यांचं प्रतिपादन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 25, 2025 20:42 PM
views 46  views

सिंधुदुर्गनगरी : आणीबाणी ही काँग्रेस सरकारने केलेली संविधानाची हत्या असून, ते दिवस विसरणे शक्य नाही. संविधान संविधान म्हणून जे सध्या गळा काढत आहेत त्यांच्या आजीने संविधानाची केलेली ही हत्या होती. असे सांगतानाच आजचा दिवस म्हणजे काळा दिवस असून इंदिरा सरकारने संविधानाची केलेली हत्या सर्वांसमोर जाणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन माजी खासदार तथा गोवा राज्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी केले.

   सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने संविधान हत्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी आणीबाणी मध्ये ज्यांनी तुरुंगवास भोगला अशा नागरिकांचा सत्कार करण्यात आला. आणीबाणी चे हे पन्नासवे वर्ष असून हा दिवस काळा दिवस म्हणून तसेच संविधानाची हत्या दिवस म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी माजी खासदार नरेंद्र सावईकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी आमदार एडवोकेट अजित गोगटे, माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार मराठे, सरचिटणीस रणजीत देसाई, संदीप साटम, मनोज रावराणे, राजू राऊळ, पुखराज पुरोहित, प्रसन्न तथा बाळू देसाई, प्रमोद रावराणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याबरोबरच पन्नास वर्षांपूर्वी आणीबाणी काळात ज्यांनी तुरुंगवास भोगला अशा व्यक्ती व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. 

  या समारंभात राजू राऊळ यांनी प्रस्ताविक करताना आणीबाणी काळात ज्यांना तुरुंगवास भोगावा लागला त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची झालेली अवस्था याबाबत सांगतानाच आणीबाणी आणि हा कार्यक्रम याबाबत सांगितले. यावेळी ज्यांनी तुरुंगवास भोगला अशांनी आपले अनुभव कथन केले. तर काहीजणांच्या कुटुंबीयांनी ही आपले अनुभव सांगितले यावेळी सभागृह अक्षरश: गहिवरून गेले होते. 

यावेळी पुढे बोलताना माजी खासदार नरेंद्र सावईकर म्हणाले की, पन्नास वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांनी या देशावर राज्य करायचं तर ते मीच करणार या आकसापोटी लोकांचा असलेला विरोध जुगारून जनतेला आणीबाणीच्या काळाकुट्ट अंधारात ढकलून दिले. कुणालाही माहीत नसताना अचानक जे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान करत होते अशांना उचलून तुरुंगांमध्ये डांबले. 21 महिने एवढा कालावधी चाललेल्या या आणीबाणी मध्ये विरोधकांना पूर्णपणे संपून टाकण्याचा प्रयत्न तत्कालीन काँग्रेस सरकारने विशेषता इंदिरा गांधी सरकारने केला. याला आता पन्नास वर्षे पूर्ण झाली असून, आणीबाणीचं हे भयाव सत्य सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यावेळी ज्यांनी तुरुंगवास भोगला अशांना बोलावून त्यांचा सन्मान केला ही फार महत्त्वाची बाब आहे. संविधान त्याचप्रमाणे राष्ट्रहित प्रथम आणि सर्वसामान्य माणसांचा आवाज जर कोण ओळखत असेल तर तो केवळ भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे. असे सांगतानाच देशातील जनतेने या आणीबाणीचा धडा घेऊन अशी घटना पुन्हा घडणार नाही यासाठी सदैव तत्पर राहीले पाहिजे असे स्पष्ट केले. 

यावेळी पुखराज पुरोहित, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, आदींनी आपले विचार मांडताना आणीबाणीमुळे जे तुरुंगात गेले त्यांनी भोगलेले कष्ट आणि ते कुटुंबात नसल्यामुळे कुटुंबाची झालेली ससेहोलपट याबाबत आपले विचार व्यक्त केले. 

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या तेरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद राव राणे यांनी व्यक्त केले या समारंभात उपस्थित सुमारे 33 जणांचा सत्कार करण्यात आला.