आणीबाणीतील घडामोडींवर आधारित चित्र प्रदर्शन

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 25, 2025 20:30 PM
views 53  views

सिंधुदुर्गनगरी :  देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला आज २५ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली.  यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देशात सन 1975 ते 1977 मध्ये लावलेल्या आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, आरती देसाई, शारदा पोवार, संघर्षयात्री गजानन पणशीकर, नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य प्रभाकर सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.


 देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला आज २५ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.  १९७५ ते १९७७ या दरम्यान लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपवणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीत अनेक जणांनी योगदान दिलं. या लढ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. आणीबाणीच्या या लढ्यात संघर्षयात्रींनी सामाजिक आणि राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला होता त्यांचे हे कार्य सदैव स्मरणात राहण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.   हे प्रदर्शन २७ जून पर्यंत नागरीकांना बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी केले आहे.