जि. प. आरोग्य - पाणी विभागात अधिकारी - ठेकेदारांच्या संगनमताने अपहार ?

प्रसाद गावडेंचा आरोप
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 16, 2025 18:03 PM
views 121  views

सिंधुदुर्गनगरी :  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडे आरोग्य विभाग आणि पाणी व स्वच्छता विभागामध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार विमा योजना अंशदान रक्कमेत  गैरव्यवहार झाला असून अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी विभागीय आयुक्तांकडे सखोल चौकशीची मागणी केली करून कामगारांना न्याय देण्याची विनंती केली होती. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सखोल चौकशी करून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करून तीन महिने कालावधी उलटून देखील जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाला चौकशी कार्यवाही करण्यासाठी मुहूर्तच सापडत नाही हे दुर्दैव आहे. 

कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करून त्यांच्या हक्काचे पीएफ व ईएसआयसी योजनेच्या पैशांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप प्रसाद गावडे निकरत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीस मुहूर्त सापडण्यासाठी पंचांग भेट देण्याचा इशारा प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.तर जिल्हा परिषदेच्या पारदर्शी कारभारावर भेलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. कंत्राटी कामगारांसाठीच्या विविध लाभ योजनां ची अंशदान रक्कम भरणा केल्याचे पुरावे तपासणी न करता कंत्राटदारांना देयके अदा करण्यामागे नेमके कोणते हितसंबंध गुंतले आहेत याची सखोल चौकशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करून कामगारांना न्याय देण्याची विनंती प्रसाद गावडे यांनी केली आहे.