
दोडामार्ग : परिसरात थैमान घालणार्या हत्तींच्या उपद्रवाने परिसीमा गाठली आहे. हत्तींनी काल रात्री कोलझर येथे माड बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान केले; मात्र त्यांच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले वनविभागाचे पथक या वेळी गस्ती ऐवजी चक्क निद्रीस्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे वनविभागाबाबत संतापाची लाट उसळली आहे.
हत्ती गेले दोन आठवडे तळकट आणि कोलझर या भागात धुडगूस घालत आहेत. ते या दोन्ही गावांच्या सिमेवर दिवसभर मुक्कामाला असतात; मात्र सायंकाळ होताच खाली उतरून बागायती अक्षरशः पायदळी तुडवत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाने आधुनिक तंत्रज्ञानासह पथक सक्रिय ठेवले आहे. यावर शासन लाखो रूपये खर्च करत आहेत. प्रत्यक्षात हे पथक निष्क्रीय ठरत आहेत. ड्रोनव्दारे हत्तीचे लोकेशन समजत असूनही हे पथक केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिकांच्या डोळ्यादेखत हत्ती बागायती उध्वस्त करत आहेत. वनविभागाच्या या पथकाच्या निष्क्रीयतेने काल परिसिमा गाठली. हत्ती काल रात्रभर बागायतीमध्ये धुडगूस घालत होते;मात्र या पथकातील ड्रोन ऑपरेटर सोडून बाकी कोणीच तेथे नव्हते.
हत्तींचा हा कळप काल रात्री ११ च्या दरम्यान कोलझर मधलीवाडी येथील रस्त्याच्या वरच्या भागात पोहोचला. त्याठिकाणी शिवप्रसाद देसाई यांच्या मालकीची नारळीची बाग आहे. यात घुसून हत्तींनी नुकसान सुरू केले. ड्रोनमध्ये त्यांचे लोकेशन कोलझर दिसत होते; मात्र वनविभागाचे एक पथक तळकटमध्ये सक्रिय होते. हत्ती असलेल्या ठिकाणी वनकर्मचारी होते; मात्र त्यांच्याकडे हत्तींना हुसकावण्यासाठी फटाकेच नव्हते. स्थानिक मोठ्यासंख्येने तेथे जमले होते. त्यांनी वनकर्मचार्यांना धारेवर धरल्यानंतर तळकटमधील पथकाला बोलावण्यात आले. त्यांनी येवून फटाके वाजवताच ते हत्ती डोंगराच्या दिशेने रवाना झाले. ड्रोन ऑपरेटर हत्तीचे लोकेशन पाहत होते; मात्र या नंतर गस्तीवर असलेले वनपथक हत्तीचा माघ सोडून गायब झाले.
मध्यरात्रीनंतर हा कळप पुन्हा कोलझर मधलीवाडी दाखल झाला. तो थेट वस्तीच्या दिशेने तेथील बोर्डींग परिसरात पोहोचला. स्थानिकांना तेथे हत्तीच्या आगमनाची चाहुल लागली. काही वेळातच हा कळप पुन्हा श्री. देसाई यांच्या बागेकडे पोहोचला. त्यांनी नारळबाग उध्वस्त करायला सुरूवात केली. तळकट आणि कोलझरमधील स्थानिक त्याठिकाणी जमा झाले; मात्र हत्ती आक्रमक असल्याने समोर जाण्याची सोय नव्हती. यावेळी वनकर्मचारी गायब होते. हत्तींनी पहाटेपर्यंत बागेचा अक्षरशः फडशा पाडला. नारळाची लागायला आलेली झाडे उध्वस्त करून टाकली.