
सिंधुदुर्गनगरी : २०१४ नंतर तब्बल १० वर्षांनी पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात एक हत्तीरोग बाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून रुग्ण आढळलेल्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेमार्फत संबधित रुग्ण उपचारखाली आणण्यात आला आहे. तसेच रुग्ण आढळलेल्या भागात आरोग्य यंत्रणेमार्फत सर्व्हे करण्यास सुरुवात करण्यात आली असून या भागातील नागरिकांचे नमुने घेण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन ही आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
दैनंदिन जीवन जगण्यात अडथळा ठरणारा हत्तीरोग क्युलेक्स जातीच्या डासापासून होतो. यामध्ये रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात व रुग्णाच्या हालचालीला बंधने येतात. तुंबलेल्या गटारी, डबक्यातील घाण पाण्यात क्युलेक्स डासांची उत्पत्ती होते. हाच डास हत्तीरोगाच्या रुग्णास चावून इतरांना चावल्यास हा आजार पसरतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१४ मध्ये हत्तीरोगाचे ७१ रुग्ण आढळून आले होते. हे सर्व रुग्ण सध्या उपचारावर आहे. त्यानंतर हत्तीरोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने सातत्याने जनजागृती करण्यात येते होती. स्वच्छतेचे महत्वही पटवून देण्यात येत होते. परिणामी २०१४ पासून आता पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने हत्तीरोग बाधित रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र आता तब्बल १० वर्षांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील एका महिलेचा अहवाल हत्तीरोग बाधित आढळून आला आहे. या महिलेच्या रक्तात हत्तीरोगाचे जंतू आढळून आले आहे. पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत याचे निदान झाले आहे.
जोखिमग्रास्त भागात सर्व्हे सुरू
मालवण तालुक्यातील ज्या भागातील महिलेच्या रक्तात हत्तीरोगाचे जंतू आढळून आले आहेत. त्या भागातील नागरिकांचा आरोग्य यंत्रणेमार्फत सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. यासाठी प्रत्येकी ८ जणांची दोन पथकामार्फत रक्त नमुने गोळा करण्यात सुरुवात करण्यात आली आहे.
नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे
नव्याने हत्तीरोग बाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या शरीरात जंतू आढळून आले आहेत. त्याच्या शरीरात हत्तीरोगाची लक्षणे दिसण्यास अजून १ ते २ वर्षाचा कालावधी लागू शकतो. मात्र वेळीच निदान झाले असल्याने आणि औषधोपचार सुरू झाल्याने हा रुग्ण पूर्णतः बरा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष
तुंबलेल्या गटारी, डबक्यातील घाण पाण्यात क्युलेक्स डासांची उत्पत्ती होते. हाच डास हत्तीरोगाच्या रुग्णास चावून इतरांना चावल्यास हा आजार पसरतो. आणि मालवण नगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी अशी ठिकाणे आहेत. गटारे, नाल्यांची सफाई व्हावी अशी मागणी वारंवार होत असतानाही नगरपालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.