
सावंतवाडी : स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून जिल्ह्यातील वीज ग्राहकांवर होणारा अन्याय, महावितरणचा अनागोंदी कारभार, स्मार्ट मीटर सक्ती, वारंवार वसूल केली जाणारी सुरक्षा अनामत ठेव रक्कम, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आदी अनेक मागण्या घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे महावितरणच्या विरोधात लाक्षणिक उपोषण छेडले होते. उपोषणस्थळी राज्याचे बंदरे तथा मत्स्य व्यवसाय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन जिल्ह्यातील वीज ग्राहकांना भेडसावत असलेल्या समस्यांवर वीजमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी वीज ग्राहकांचे निवेदन स्वीकारून जिल्ह्यातील वीज समस्या सोडविण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर वीज ग्राहक संघटनेचे उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष गणेश तथा बाळ बोर्डेकर, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, सहसचिव समीर शिंदे, सचिव तुकाराम म्हापसेकर, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, कणकवली तालुका अध्यक्ष दादा कुलकर्णी, दिनेश पटेल तालुकाध्यक्ष देवगड, आदि वीज ग्राहक संघटना पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जवळपास गेली अडीच वर्षे जिल्ह्यातील वीज प्रश्नासाठी आंदोलने, महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देणे आदी सर्व प्रयत्न करून शेवटी वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. जिल्ह्यात आज सक्तीने स्मार्ट मीटर बसविणे, वारंवार वीज ग्राहकांकडून सुरक्षा ठेव वसूल करणे, दिवसातून दहा पंधरा वेळा खंडित होणारा वीज पुरवठा, मोडकळीस आलेली वीज यंत्रणा अशा कितीतरी समस्या उद्भवत आहेत. परंतु जिल्हावासियांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे ना महावितरण गांभीर्याने पाहत आहे की जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सदरचे प्रकरण हाताळत आहेत. त्यामुळे वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गच्या वतीने काल १५ ऑगस्ट रोजी महावितरणच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री नाम.नितेश राणे यांनी जिल्ह्यातील वीज यंत्रणा सुरळीत करण्यासाठी आलेला निधी आणि सुरू असलेली कामे याबाबत माहिती देत तात्काळ नव्हे परंतु येत्या चार पाच वर्षात विजेचे प्रश्न नक्कीच निकाली निघतील अशी आशा व्यक्त केली. त्याचबरोबर आपण मुख्यमंत्री तथा वीज मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी भेटून जिल्ह्यातील वीज प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.
उपोषणादरम्यान महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी वीज ग्राहक संघटनेचे म्हणणे ऐकून घेत संघटने कडून दिलेले निवेदन स्वीकारून तात्काळ त्या निवेदनाचा विचार करून जिल्ह्यातील वीज प्रश्न तातडीने सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर महावितरणच्या विरोधात सुरू असलेले उपोषण वीज ग्राहक संघटने कडून स्थगित करण्यात आले. यावेळी वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी संतोष तावडे, मंथन गवस, भाऊसाहेब देसाई, जयराम वायंगणकर, वाल्मिकी कुबल, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, सेलेस्तीन शिरोडकर, प्रा.गणपत शिरोडकर, स्वप्निल वेंगुर्लेकर, ओटवणे सरपंच संतोष कासकर, रवींद्र म्हापसेकर, गुरु बुराण आधी अनेक वीज ग्राहक उपस्थित होते.