जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची स्थिर सर्वेक्षण पथकास अचानक भेट

Edited by:
Published on: November 05, 2024 20:49 PM
views 274  views

  सिंधुदुर्ग : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एंट्री पॉईन्टवर वाहनांची तपासणी करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) कार्यान्वित करण्यात आली आहे. आज दुपारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अचानक भेटी देऊन स्थिर पथकास आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना दिल्या. आपला जिल्हा दोन राज्याच्या सीमेलगत असल्याने विशेषत: सिमेलगत असणाऱ्या स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले.

सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी वेंगुर्ला तालुक्यातील सोन्सुरे येथील मतदान केंद्राला भेट देऊन सोयी सुविधांची पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर, २०२४ रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुका निर्भयपणे पार पडण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्ग, शहरातील एंट्री पॉइंट, आंतरराज्य सीमावर्ती भाग, जिल्हामार्गावर वाहनांची तपासणी करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित करण्यात आली आहे. या पथकांचे कामकाज तपासण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी वेंगुर्ला तालुक्यातील मठ चेकपोस्ट, तेरेखोल-गोवा बॉर्डर चेकपोस्ट, आरोंदा-किरणपाणी चेकपोस्ट, सातार्डा, बांदा चेकपोस्टला भेटी देऊन येथील एसएसटी पथकांसह कामकाजांची पाहणी केली.  तसेच तेथील कामकाजाची माहिती जाणून घेऊन वाहन नोंदवहीचीही तपासणी केली.