राज्याच्या व्यसनमुक्ती धोरण २०११च्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार ; नशाबंदी मंडळाचा निर्धार!

कणकवली पोलीस स्थानकात 'संवाद' कार्यशाळा संपन्न
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 14, 2022 17:40 PM
views 187  views

कणकवली : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बांधव, तंटामुक्त समिती,  गावाचे सर्व पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दलाचे सर्व समिती सदस्य यांच्यासाठी   २०११ च्या  व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी तसेच वाढत्या 'व्यसनाधीनतेवर नियंत्रण' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यशाळेच्या निमित्ताने कणकवली पोलीस स्टेशनमध्ये व्यसनमुक्ती धोरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या धोरणाच्या मदतीने गावातल्या व्यसनमुक्त समित्या प्रभावीपणे व्यसनमुक्तीसाठी कार्यरत राहतील.  शिवाय गावातील तरुणांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी या समित्यांची मदत होईल.

व्यसनमुक्तीसाठी गावागावातून पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, चित्रफिती यांद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून राहील. गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर व्यसनमुक्त गावे आणि व्यसनमुक्त कुटुंबे अशा स्पर्धांचे पुढील काळात आयोजन करण्यात येईल.

अशा प्रकारची चर्चा 'संवाद' या कार्यशाळेत कणकवली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आली.

यावेळी ए. ए. ग्रुपचे प्रतिनिधी, कणकवली तालुक्यातील पोलीस पाटील आणि कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस बांधव यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. शेवटी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन कार्यशाळेची सांगता करण्यात आली.