
सावंतवाडी : गोवा सीमेवर वावरणाऱ्या ओंकारसह दोडामार्ग तालुक्यातील सर्व हत्तींना पकडून 'वनतारा' येथे पाठवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे वनमंत्री या प्रस्तावासाठी अनुकूल असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. त्याबाबची बैठक लवकर मंत्रालय पातळीवर होणार आहे अशी माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
श्री.केसरकर यांनी हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानीवर चिंता व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून हत्तींमुळे शेतीचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी जीवितहानीसुद्धा झाली आहे. त्यामुळे या हत्तींना सुरक्षित ठिकाणी हलवणे आवश्यक आहे. यावर तोडगा म्हणून ओंकारसह इतर हत्तींना पकडून ‘वनतारा’ येथे पाठवण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. खुद्द वनमंत्र्यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून या आठवड्यात याबाबत बैठक होऊन निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'वनतारा' मध्ये प्राण्यांची योग्य ती काळजी घेतली जाते असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हे हत्ती तिथे सुरक्षित राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संजय राऊत यांच्यावरही त्यांनी शरसंधान साधले. कोण काय बोलतंय ? याला महत्त्व नाही. शिवसेना आमची आहे, पक्षचिन्ह आमच्याकडे आहे आणि निवडून आलेले आमदार-खासदार सुद्धा आमचेच आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणती हे जनतेला माहीत आहे. अशा विधानांवर बोलणे योग्य वाटत नाही असा टोला हाणला.










