
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने चालू राहावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ दीपक परब तसेच गव्हर्निंग कौन्सिल मेंबर राजन नाईक व संतोष राणे यांनी फ्लाय 91 या विमान कंपनीच्या गोवा येथील मुख्य कार्यालयात कंपनीचे मालक व वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून फ्लाय 91 ची उड्डाणे नियमित होण्यासाठी आग्रही निवेदन दिले. प्रामुख्याने सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठी फ्लाय91 ने प्रयत्न करावेत अशी मागणी मासीया तर्फे करण्यात आली. त्यावेळी ही सेवा सुरू होण्यासाठी मुंबई विमानतळावर फ्लाय 91 कंपनीला स्लॉट मिळणे अत्यावश्यक असल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे सदरील स्लॉट मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे फ्लाय91 विमान कंपनीला सांगण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई येथे सुरू होत असलेल्या नवीन इंटरनॅशनल एअरपोर्टवर सिंधुदुर्ग एअरपोर्ट वरून येणाऱ्या जाणाऱ्या विमान कंपन्यांसाठी साठी स्लॉट मिळवण्यासाठी मासिया तर्फे केंद्रीय सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर यांच्या बरोबर चर्चा करून विशेष प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग- सोलापूर, सिंधुदुर्ग -पुणे, सिंधुदूर्ग - नाशिक, सिंधुदूर्ग - छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग- जळगाव, सिंधुदुर्ग- हैदराबाद व सिंधुदुर्ग- बेंगलोर ही विमान सेवा सुरू करण्याविषयी निवेदन देऊन विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यालाही फ्लाय 91 च्या अधिकाऱ्यांनी तत्वतः मान्यता देत लवकरच या सेवा ही नियमित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे आश्वासित केले. सिंधुदुर्ग एअरपोर्टवर नाईट लँडिंग ची सुविधा अद्याप सुरू न झाल्यामुळे तथा पूर्ण क्षमतेने मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच वेळा दृश्यमानते मध्ये अडथळा आल्यामुळे सिंधुदुर्ग विमानतळावर येणारी विमाने ऐनवेळी मोपा - गोवा येथील विमानतळावर वळविण्याची वेळ येते अशी खंत फ्लाय91 कंपनीने व्यक्त केली. या अडचणी वेळीच दूर झाल्या तर सिंधुदुर्ग एअरपोर्ट निश्चितपणे पूर्ण क्षमतेने सुरू राहू शकतो असे मत कंपनीने व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ दीपक परब व गव्हर्निंग कौन्सिल मेंबर राजन नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती सिंधुदुर्ग विमानतळासाठी पोषक आहे त्यामुळे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेशजी राणे, स्थानिक आमदार दीपकजी केसरकर तसेच कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे, माजी खासदार तथा माजी एव्हिएशन मिनिस्टर श्री सुरेशजी प्रभू हे निश्चितपणे सिंधुदुर्ग विमानतळावरील तांत्रिक अडचणी दूर करून प्रवासी वाहतूक नियमित होण्यासाठी नक्की प्रयत्न करतील असा विश्वास बोलून दाखवीला. मासिया तर्फे लवकरच या सर्वांची भेट घेऊन विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती करण्यात येणार असल्याचे परब व नाईक यांनी सांगितले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या रनवेची बांधणी लक्षात घेता या ठिकाणी ठराविक विमान कंपन्याच प्रवासी विमान वाहतूक करू शकतात असेही त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी फ्लाय 91 चे मालक श्री मनोज चाको, चीफ रेवेन्यू ऑफीसर आशुतोष चिटणीस, जनरल मॅनेजर निमिश जोशी, आणि सेल्स मॅनेजर सतीश खाडे उपस्थित होते.