सिंधुदुर्गात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू : रविंद्र चव्हाण

फुटबॉल क्लब सुरू करण्याचा संदीप गावडेंचा निर्णय स्तुत्य
Edited by: विनायक गावस
Published on: August 17, 2023 16:30 PM
views 424  views

सावंतवाडी : राज्यस्तरीय  फुटबॉल स्पर्धेमुळे तरुणाईमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. याचाच फायदा घेवून येथील युवकांच्या हाताला काम मिळावं म्हणून सिंधुदुर्गात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मत  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान एवढ्यावर न थांबता जिल्ह्याचा सर्वागिण विकास झाला पाहिजे, प्रत्येक गावाला वेगळी ओळख मिळाली पाहिजे यासाठी माझे प्रयत्न असणार आहे. त्यासाठी संदिप गावडे सारख्या तरुण व त्यांच्या सहकार्‍यांनी पुढाकार घ्यावा असं रविंद्र चव्हाण म्हणाले. भाजपा युवा नेते संदिप गावडेंच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मान्सून चषक फुटबॉल स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित राहून खेळाडुंना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.


१५ ऑगस्टला जिल्ह्यात येणार होतो. परंतू, शासन स्तरावर अचानक जबाबदारी बदलण्यात आल्यामुळे मी अन्य ठीकाणी गेलो. त्यामुळे या स्पर्धेला येवू शकलो नाही याची खंत आहे. परंतू अशा स्पर्धांच्या माध्यमातून नव्याने स्पर्धक घडले पाहीजेत. मैदानी खेळाला महत्व आहे. त्यापेक्षा फुटबॉलला महत्व आहे. या खेळातील खेळाडुंना राष्ट्रीय स्तरावर चमकता आले पाहीजे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. संदिप गावडे व त्यांच्या सहकार्‍यांनी पुढाकार घेवून सुरू केलेला हा उपक्रम अशाच पध्दतीने दरवर्षी चालविला जावा आणि त्यातून अनेक खेळाडू घडावेत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. भविष्यात खेळा बरोबर येथिल युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. विशेष म्हणजे त्यादृष्टीने या ठिकाणी काही करता येवू शकते यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे. नुसती फुटबॉल स्पर्धा घेवून या ठिकाणी गावडे थांबले नाहीत तर त्यांनी सावंतवाडी फुटबॉल क्लब सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा स्तुत्य आहे. या क्लबच्या माध्यमातून भविष्यात अनेक खेळाडू घडावेत यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. तसेच हिरण्यकेशी नदीचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. भविष्यात त्याला व्यापक स्वरुप प्राप्त व्हावे आणि या अभियानात हिरण्यकेशी नदीच्या काठावर असलेल्या गावातील ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. त्याचबरोबर संदीप गावडे यांच्या माध्यमातून गेळेगावचा आदर्श बंड या कोल्हापूर संघात खेळणाऱ्या विद्यार्थ्याला क्रिकेट किट देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले,  सिंधुदूर्ग जिल्ह्यात जास्त प्रचलित नसलेला फुटबॉल सारखा खेळ घेवून येथिल नवोदीत खेळाडुंना प्रोत्साहन देण्याचे काम संदिप गावडे व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे. केवळ स्पर्धा म्हणून नाही तर या खेळातून नवोदीत खेळाडू घडावेत यासाठी आश्वासक पध्दतीने याकडे पाहीले भविष्यात जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकला जावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला संदिप गावडे यांनी जोड दिली हे महत्वाचे आहे पक्ष म्हणून आम्ही कायम पाठीशी आहोत असं मत व्यक्त केले.

यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, मंदार कल्याणकर, पंकज पेडणेकर, राजू राऊळ, निलेश तेंडुलकर, विनय केनवडेकर, श्रीपाद तवटे,हळदणकर, दिलीप भालेकर, समर्थ राणे, परिक्षित मांजरेकर, गुरुनाथ कासले, गणेश कुशे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, रुपेश हिराप, अमोल टेंबकार आदी उपस्थित होते.