रस्ते अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी

राज्यात १७ ठिकाणी ‘स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग’ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Edited by:
Published on: December 12, 2023 17:34 PM
views 265  views

नागपूर : रस्ते उपघात रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी  करण्यात येत असून त्याचे दृष्यस्वरूपात बदल दिसून येतील, अशी ग्वाही देतानाच राज्यात १७ ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग, २३ ठिकाणी स्वयंचलित वाहनयोग्यता प्रमाणपत्र केंद्र उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य अशोक चव्हाण यांनी राज्यात होत असलेल्या वाहन अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यत किमान ६० ते ७० लाख वाहनांनी प्रवास केला असून समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक दहा किमी अंतरावर रम्बलर बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.

वाहन चालक परवाना स्वयंचलित पद्धतीने देण्यासाठी राज्यात १७ ठिकाणी ऑटोमॅटीक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासंदर्भात त्याची कार्यवाही सुरू आहे. ट्रॅकसाठी दोन महिन्यात कार्यादेश देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. २३ ठिकाणी ऑटोमॅटीक फिटनेस सेंटर्स देखील करण्यात येत असून वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्राची मदत संपण्यापूर्वी संबंधितांना पूर्वकल्पना देण्याबाबत यंत्रणा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्रीमती वर्षा गायकवाड, देवयानी फरांदे यांनी भाग घेतला.