शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतली आंदोलकांची भेट | तो 'लॉग मार्च' तुर्त स्थगित

Edited by:
Published on: October 30, 2023 14:38 PM
views 417  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने कमी पटसंख्या हे कारण सांगून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या आणि राज्य शासनाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या शाळा बंद करुन त्या समुह शाळेत समायोजित करण्याच्या निर्णया विरोधात आजरा येथुन 'शिक्षण हक्क यात्रा' अर्थात लॉग मार्च आंदोलन आयोजित केले होते.

आजरा ते सावंतवाडी असा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरावर हा लॉग मार्च काढण्यात येणार होता. रविवारी रात्री आंबोली येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या आंदोलकांची भेट घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले. शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल्यानंतर शिक्षणमंत्र्यांचा घराच्या दिशेने आजरा येथुन निघालेला हा लॉंग मार्च तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शाळा बचाव आंदोलक कॉ. संपत देसाई यांनी दिली आहे.

शासनाच्या त्या निर्णयाविरोधात आजरा येथुन 'शिक्षण हक्क यात्रा' अर्थात लॉग मार्च आंदोलन आयोजित केले होते. दरम्यान, आंबोली येथे रविवारी रात्री शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलकांची समक्ष भेट घेवुन चर्चा केली. यावेळी या विषयाबाबतचे शंकानिरसन त्यांनी केले. तर महाराष्ट्र शासनाने वाड्या वस्तीवरील कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

शिक्षण आयुक्त यांनी काढलेल्या पत्रामधील मजकुरामध्ये सुध्दा समुह शाळानिर्मीतीचा हेतू हा विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणे व गुणवत्तापुर्ण शिक्षण उपलब्ध करुन देणे हा आहे. तसेच शाळा बंद करण्याचा हेतू नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.


यानंतर शाळा बचाव आंदोलनाच्यावतीने २० पटाखालील शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री यांच्या घराच्या दिशेने आजरा येथून निघालेला  लॉग मार्च दीपक केसरकर यांच्यासोबत समाधानकारक चर्चा झाल्याने व लेखी पत्र दिल्याने आम्ही तात्पुरता स्थगित करीत आहोत अशी माहिती शाळा बचाव आंदोलक कॉ.संपत देसाई यांनी दिली.