विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतय शिक्षणमंत्र्यांच खात : विनायक राऊत

केसरकरांविरोधात तेली - राऊतांचे सुर जुळले..!
Edited by: विनायक गांवस
Published on: July 05, 2024 09:56 AM
views 643  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्र्यांचे ज्या शाळेमध्ये शिक्षण झालं त्याच शाळेला आज कुलूप लावून या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम शिक्षणमंत्र्यांच्या खात्याने केल आहे. शिक्षण मंत्र्यांच्या घराच्या बाजूलाच असलेली जिल्हा परिषदेची शाळा कोसळते आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित व्हावे लागते ही गोष्ट खरोखर दुर्देवी आहे असा टोला माजी खासदार विनायक राऊत यांनी लगावला.

दरम्यान, राजन तेलींनी केलेली मागणी ही योग्यच असून त्यामध्ये त्यांनी मांडलेले मुद्दे योग्यच आहेत. केवळ आणि केवळ सिंधुदुर्ग-रत्नागिरी सारख्या डोंगरी भागांना ज्या काही सवलती मिळाल्या होत्या त्या पूर्णपणे काढून टाकायच काम या शिक्षणमंत्र्यांनी केल असून एक प्रकारे शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायच काम केसरकर करत असल्याचा आरोप माजी खा. राऊत यांनी केला‌. सावंतवाडी तालुका दौऱ्यावर आले असताना त्यांनी सावंतवाडी शहरातील शाळा नंबर एकच्या कोसळलेल्या भागाची पहाणी केली. यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्गातील किमान २२ शाळा जीर्ण अवस्थेत आहेत. त्या कधीही कोसळू शकतात. तरी देखील त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसवलं जातंय. त्यामुळे शिक्षण खात्याची लापरवाही महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम शालेय शिक्षणमंत्री व त्यांच खात  करत आहेत असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी  केला. यावेळी उबाठा शिवसेना संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, मायकल डिसोजा, जान्हवी सावंत, शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, शैलैश गवंडळकर, अजित सांगेलकर, कौस्तुभ गावडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.