
देवगड : निसर्ग संवर्धन आणि परंपरेचा सुरेख संगम साधत देवगड तालुक्यातील तिर्लोट-दळवीवाडी येथील 'जय हनुमान विकास मंडळाने' यंदा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. 'निश्चय नैसर्गिक रंगांचा, ध्यास पर्यावरण रक्षणाचा' हा मंत्र जपत मंडळाने यंदाची होळी अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी केली,होळीच्या उत्सवात होणारी वृक्षतोड थांबवून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मंडळाने घेतलेला हा पुढाकार देवगड तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात वृक्षांचे महत्त्व सांगताना म्हटले होते की, 'रयतेने ही झाडे लेकरांसारखी जतन केली आहेत, ती तोडल्यावर त्यांच्या दु:खास पारावर उरणार नाही.' याच विचारांचा वारसा जपत, दळवीवाडी येथील कार्यकर्त्यांनी वृक्षतोड न करता होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.
होळीसाठी जिवंत झाडांची कत्तल न करता, पर्यावरणाची हानी टाळण्यावर भर देण्यात आला.निसर्ग जपणे हीच खरी ईश्वर सेवा आहे, हा संदेश या माध्यमातून देण्यात आला.ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटात ग्रामीण भागातून दिलेला हा संदेश शाश्वत भविष्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.धूलिवंदनासाठी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे,
"निसर्ग आपल्याला जीवन देतो, मग सणासाठी त्याची कत्तल का करायची? हाच विचार घेऊन आम्ही ही नवीन परंपरा सुरू केली आहे. माणसाला माणूस जोडणारा आणि निसर्गाशी नाते सांगणारा हा उत्सव असावा, हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे अशा प्रतिक्रिया तिर्लोट-दळवीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रतन दळवी यांनी दिल्या आहेत,
दळवीवाडी मंडळाने राबविलेल्या या 'पर्यावरणपूरक होळी' उपक्रमाचे तिर्लोट ग्रामस्थांसह संपूर्ण देवगड तालुक्यातील निसर्गप्रेमींकडून कौतुक होत आहे. दशक्रोशीत अशा प्रकारचा जनजागृतीपर उपक्रम राबविणारे हे बहुधा पहिलेच मंडळ ठरले आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' हा केवळ नारा न राहता तो कृतीत उतरवल्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.












