नागराजाच्या इको फ्रेंडली मूर्तींचे प्रदर्शन - विक्री

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 06, 2024 10:33 AM
views 138  views

देवगड : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांचे शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक ,आनंददायक आणि रंजक असले पाहिजे यासाठी 'आनंददायी शनिवार' हा उपक्रम शासनमान्य सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीसाठी राबविण्यात येत आहे. 'आनंददायी शनिवार ' उपक्रमातून विविध आनंददायी कृतीतून विद्यार्थ्यांच्या तर्कसंगत विचार, सहानुभूती, सहकार्य वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, जिज्ञासू वृत्ती, उद्योजकता यासारख्या क्षमतांचा विकास होणार आहे.

'आनंददायी शनिवार ' या उपक्रमांतर्गत तारामुंबरी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीप परब व उपशिक्षिका सुखदा गोगटे यांनी नागपंचमीचे औचित्य साधून नागराजाच्या पर्यावरण पूरक मुर्त्या साकारण्याचे नियोजन केंद्रप्रमुख स्नेहा पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला प्रेरणा देऊन हस्तकलेला वाव देण्यासाठी या उपक्रमाचा समावेश केला. कागदापासून लगदा तयार करणे, नागराजाच्या मुर्त्या तयार करणे, मूर्तींचे रंगकाम करणे इत्यादी सर्व कृतींमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्वनिर्मितीचा आनंद घेतला त्यावेळी केंद्रप्रमुख स्नेहा पारकर यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या मुर्त्यांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना सादरीकरणाची संधी देण्यात येणार आहे. 

जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा तारामुंबरी येथे बुधवार .७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत पर्यावरणपूरक नागराजांच्या मुर्त्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून त्यांची विक्री करण्यात येणार आहे. तरी छोट्या दोस्तांच्या कौशल्यातून साकारलेल्या मुर्त्यांच्या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक संदीप परब व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कल्याणी जोशी यांनी केले आहे.