
सावंतवाडी : ओवळीये गावाकडे जाणारी एस.टी. बस पुलाचे काम चालू असल्यामुळे गेले सहा महिने बंद आहे. यामुळे विद्यार्थी, सावंतवाडी येथे येणारे छोटे-मोठे भाजी विक्रेते व प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
ही बस पूर्ववत सुरू करावी, या मागणीचे सुमारे २०० ग्रामस्थांच्या स्वाक्षरींचे निवेदन सावंतवाडी आगार व्यवस्थापक नीलेश गावीत तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता वैभव सगरे यांना दिले, दरम्यान, बससेवा लवकरच सुरू करण्याची ग्वाही गावीत यांनी ग्रामस्थांना दिली. निवेदन मिळताच बांधकाम विभागाने याची तातडीने दखल घेतली. श्री. सगरे यांच्या आदेशानुसार शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी त्वरित ओवळीये येथे जात जात रस्त्याची व पुलाची पाहणी केली. एस.टी. वाहतुकीसाठी रस्ता योग्य असल्याचा अहवाल तातडीनं एस.टी. महामंडळाला पत्र देऊन दिला. बांधकाम विभागाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे ओवळीये गावात बस जाण्याचा मार्ग आता सुकर झाला असून लवकरच ही बससेवा पूर्ववत होणार आहे.
याबाबत विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, ओवळीये गावचे प्रमुख मानकरी सदानंद सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया राऊळ, निवृत्त शिक्षक मोहन गवस, सुदाम सावंत, श्रीमती सावंत, सुलोचना गवस, प्रिया गवस, नंदा सावंत, कोमल दळवी, दीपाली राऊळ, राजश्री सावंत, कल्याणी सावंत आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले.











