
अलिबाग : रायगड जिल्हयात अलिबाग समुद्र किनारी मंगळवारी धुळवडीनिमित्त आयोजित बैलगाडी, घोडागाडी व घोडेस्वारांच्या शर्यतींना अपघाताचे गालबोट लागले आहे. शर्यती पहाणाऱ्या नागरिकांमध्ये भरधाव बैलगाडी घुसल्याने राजाराम धर्मा गुरव (वय ७५ वर्ष, रा. झिराड) आणि विनायक नारायण जोशी (वय ७० वर्ष, रा. ब्राह्मण आळी, अलिबाग) या दोघांना प्राण गमवावे लागले.
बैलगाडीच्या धडकेत जखमी झालेल्या दोघा वृद्धांना तात्काळ पुढील उपचारासाठी मुंबईला पाठवले जात असतांना विनायक जोशी यांची वाटेतच प्राणज्योत मालवली, तर राजाराम गुरव यांचा मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
अलिबाग समुद्र किनारी आमदार महेंद्र दळवी पुरस्कृत या शर्यतींचे आयोजन अलिबाग कोळीवाडा शर्यत प्रेमींच्या वतीने करण्यात आले होते. अलिबाग समुद्र किनारी धुळवडीच्या दिवशी होणाऱ्या या बैलगाडी, घोडागाडी, घोडेस्वार, सायकलस्वार यांच्या शर्यतींना प्राचीन परंपरा आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार गेल्या काही वर्षांपासून या शर्यतींच्या आयोजनात खंड पडला पडला होता. मात्र न्यायालयाने काही अटी शर्थांवर शर्यती आयोजित करण्याकरिता परवानगी दिल्याने यंदा या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. परिणामी आयोजक आणि शर्यतप्रेमी यांच्यामध्ये मोठा उत्साह होता. त्यामुळे शर्यत शौकीनांनी देखील समुद्र किनारी शर्यती पहाण्याकरिता मोठी गर्दी केली होती.
शर्यती पहाणाऱ्या नागरिकांमध्ये भरधाव बैलगाडी घुसल्याने जखमी झालेल्यांपैकी विनायक नारायण जोशी यांची मुंबईला उपचारासाठी जात असताना प्राणज्योत मालवली. तसेच राजाराम गुरव हे देखील गंभिररित्या जखमी झाले असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालायत हलविण्यात आले होते. मात्र त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.
यापूर्वी देखील अलिबाग येथील बैलगाडा शर्यतीत अशाच प्रकारचा दुर्दैवी अपघात घडला होता. यात एका शर्यत प्रेमीला आपला जीव गमवावा लागला होता. मात्र पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून अलिबाग पोलिसांकडून या बैलगाडा शर्यतीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच आयोजकांकडूनही सुरक्षेच्या उपायोजना करण्यात आल्या होत्या, मात्र तरीही बैलगाडी शर्यतप्रेमी आयोजन किनाऱ्यावर उतरल्याने वेगाने आलेल्या बैलगाड्याने हा दुर्दैवी अपघात झाला.