ठाकरेंच्या काळात कवडी नाही, आम्ही 300 कोटी आणले !

भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांचं प्रतिपादन
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 13, 2023 19:11 PM
views 150  views

मालवण : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा जिल्ह्याच्या विकासासाठी  कवडीही आणता आली नाही. इकडचे आमदार, खासदार फेल झाले. मात्र आमचे सरकार आले आणि कुडाळ, मालवणात गेल्या साडेआठ वर्षात जेवढे पैसे आले नाहीत. त्यापेक्षा कितीतरी पट अधिक कोट्यावधींचा विकासनिधी गावागावात आला आहे. जिल्ह्यात ३०० कोटी विकासनिधी आला आहे. आम्ही मागणी केलेली सर्व विकासकामे शासन मंजूर करत आहे. यापेक्षाही विकासनिधी येणार आहे. कोकणवर प्रेम ठेवून मागेल तो निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिला, असे भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण दौऱ्यात स्पष्ट केले.


मालवण दौऱ्यावर असलेल्या माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, संतोष साटविलकर, महेश मांजरेकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक महेश गावकर, अमित गावडे, आबा हडकर, आशिष हडकर, दादा नाईक, युवमोर्चा अध्यक्ष मंदार लुडबे, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निषय पालेकर यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


आम्ही सर्वजण सातत्याने ना. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना केंद्र सरकार, राज्य सरकार माध्यमातून गावागावात करोडाचा विकासनिधी मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणावर प्रेम ठेवून मागेल तो निधी देत आहेत असेही राणे यांनी सांगितले.