
दोडामार्ग : उसप येथे एक डंपर रस्त्यालगत पलटी झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी २ वा.च्या सुमारास घडली. यात डंपरचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने चालक सुखरूप बचावला. संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी सुनील गवस व ग्रामस्थांनी केली आहे.
उसप गावातील मुख्य रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र या कामाला उशिरा सुरूवात झाल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने व सध्या पाऊस लागत असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास एक डंपर खडी पावडर घेऊन साटेली भेडशीहून उसपच्या दिशेने जात होता. मात्र खराब रस्त्यामुळे खड्डा चुकविण्याच्या नादात डंपर रस्त्यालगतच्या घळणीत पलटी झाला. या अपघातातून चालक बालंबाल बचावला.
अपघाताची वार्ता गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काहींनी मदतकार्य केले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या.
मंजूर रस्त्याचे काम हे महिन्यात हाती घेण यात आले. त्यामुळे कामात दिरंगाई झाली. संबंधित ठेकेदाराने वेळेत कामाला सुरुवात केली असती तर हा अपघात झाला नसता. शिवाय संबंधित अधिकाऱ्यांनी देखील याची काळजी घेणे अपेक्षित होते. मात्र अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे ठेकेदार मस्तवाल व कामात हलगर्जीपणा केला. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुनील गवस यांनी दिला आहे.