डंपर - दुचाकीचा अपघात

Edited by: लवू परब
Published on: February 25, 2025 18:17 PM
views 110  views

दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेत डंपर आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार व महिला किरकोळ जखमी झाले. मंगळवारी दुपारी १ वाजण्याचे सुमारास ही घटना घडली.

दोडामार्ग बाजारपेठेत खरेदीसाठी एक युवक व महिला दुचाकीने आले होते. बाजारपेठेतील तिलारी रस्त्यालगत असलेल्या एका सुपर मार्केटमध्ये ते जात होते. यावेळी साटेली-भेडशीहून दोडामार्गच्या दिशेने येणारा एक डंपर बाजारपेठेत उभा होता. त्यामुळे दुचाकी चालकाने त्याच्याविरुद्ध बाजूला असलेल्या सुपर मार्केटमध्ये जाण्यासाठी दुचाकी वळवली. यावेळी थांबलेल्या डंपरच्या समोरून सुपर मार्केटमध्ये जाण्यासाठी रस्ता असल्याने त्याने डंपरच्या पुढून जाण्याचा प्रयत्न केला.  मात्र दुचाकीकडे दुर्लक्ष केलेल्या डंपर चालकाने डंपर मार्गस्थ करण्यास घेतला अन् दोघांची धडक बसून अपघात झाला. यावेळी दुचाकी डंपर खाली गेली. दुचाकीच्या मागे बसलेली महिला देखील डंपर खाली गेली. जीवाच्या आकांताने तिने आरडाओरड केली. शिवाय बाजारपेठेत उभ्या असलेल्या काहींनी देखील आरडाओरड करत डंपर चालकास डंपर तात्काळ उभा करण्यास सांगितले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

महिलेला डंपर खालून तात्काळ बाहेर काढले. दुचाकी स्वार व महिला अपघातात जखमी झाले. घटनास्थळी जमाव वाढू लागला. पोलिसांनी डंपर व दुचाकी थेट येथील पोलीस ठाण्यात आणले. डंपर चालक व दुचाकीस्वाराने आपापसात हे प्रकरण तडजोडीने मिटविले.