गुळदुवे एसटी स्टॉपवर मद्यपींचा धिंगाणा

मनसेने वेधले पोलिसांचे लक्ष
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 02, 2022 15:41 PM
views 428  views

सावंतवाडी : तालुक्यातील गुळदुवे येथील एसटी स्टॉपवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची, विद्यार्थ्यांची  ये - जा होत असते. सदर बसस्थानक हे वस्तीपासून काही अंतरावर आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तेथील नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत. मागील बरेच दिवस त्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांचा धिंगाणा तसेच बाटल्या फोडण्याचे प्रकार होत आहेत. त्यानुसार बुधवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोंदा पोलिसांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

 गुळदुवे येथील एसटी बस स्टॉपजवळ जास्त रहदारी नसल्याने बस स्थानकला मद्यपान करणाऱ्या लोकांचा विळखा झाला आहे. तेथील बस स्थानक जवळ बसून रात्री - अपरात्री काही अज्ञात लोकांकडून मद्यपान तसेच बाटल्या त्या ठिकाणीच फोडून धिंगाणा घालण्याचा प्रकार मागील काही दिवस सुरू असल्याच्या तक्रारी तेथील ग्रामस्थांकडून मनसेचे पदाधिकारी राजेश मामलेकर यांच्याकडे दिल्याने त्याची दखल घेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी  आरोंदा पोलीस स्टेशन गाठले व लेखी निवेदन देत त्या ठिकाणी होणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर कारवाईची मागणी केली. तसेच मनसेच्या माध्यमातून सदर स्टॉप वर सोलर लाईट बसविण्यात आली होती, त्याचीही चोरी झाली असल्याने सदर बाब ही त्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्याकडूनच झाली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे निवेदनाद्वारे त्या ठिकाणी पोलिसांनी गस्त घालून सदर मद्यपान करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या माध्यमातून पोलिसांकडे करण्यात आली आहे. 

दरम्यान, सदर निवेदनाची दखल घेण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन देण्यात आले. यावेळी मनसे लॉटरी सेनेचे तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर, तिरोडा शाखा अध्यक्ष मनोज कांबळे, दिलीप पालकर, मयूर पालकर आदी उपस्थित होते.