समुद्रातली मस्ती जीवावर बेतली

एकाचा मृतदेह सापडला ; दुसऱ्याचा शोध सुरु
Edited by: जुईली पांगम
Published on: October 06, 2022 20:39 PM
views 301  views
हायलाइट
सावंतवाडीतील कामगार

वेंगुर्ले, दिपेश परब : शिरोडा येथील समुद्रावर मौजमजा करण्यासाठी गेलेले दोघे कामगार बुडाले. त्यातील सुभाष रामोत्तर कुमावत (३०) याचा मृतदेह सापडला असून दीनदयाळ राव (२०) याचा शोध सुरू आहे. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वेळागर परिसरात घडली. याबाबत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी माहिती दिली आहे.


सावंतवाडीतील कामगार 

संबंधित कामगार हे सावंतवाडी शहरात एका फरशीच्या दुकानात कामाला होते. हे दोघेही राजस्थान येथील असून दसऱ्याची सुट्टी असल्यामुळे ते मौजमजा करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसमवेत समुद्रावर गेले होते. यावेळी हा प्रकार घडला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघेही पाण्यात गेले. मात्र त्या ठिकाणी एक बेपत्ता झाला, तर दुसऱ्याला बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमाकांत दळवी व पोलीस नाईक योगेश राऊळ करत आहेत.


सुरक्षेच्या अभावाने जातायत जीव ? 

 शिरोडा वेळागर येथे दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असून महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून योग्य त्या उपाय योजना होत नसल्याने समुद्र किनारी आंघोळी साठी पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांच्या अपघाती मृत्यू च्या संख्येत वाढ होऊन सध्या चिंतेचे वातावरण आहे. कोकण पर्यटन वाढी च्या घोषणा करणाऱ्या या मंडळ ला कधी जाग येणार ? अजून किती मृत्यू होई पर्यंत हे मंडळ वाट पाहत राहणार आहे ?  सर्व माध्यमातून वारंवार  मागणी करूनही शासन स्तरावर प्रत्येक सागरी पर्यटन स्थळी जीव रक्षकांची तसेच जेटस्की सारख्या उपकरणांची सोय सुविधा का निर्माण करत नाही ? गोवा सारख्या सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन स्थळी का उपलब्ध करून देत नाही असा संतप्त सवाल शिरोडा ग्रामपंचायत सरपंच मनोज उगवेकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

   शिरोडा ग्रामपंचायत ने येथे लाईफ गार्ड म्हणून नियुक्त केलेले संजय नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार जे दोघे कामगार बुडाले त्यातील एकाचे शवं मिळाले ते समुद्र किनारी लागलेले होते.