७ ते १३ जानेवारीला कुडाळमध्ये नाट्य महोत्सव

Edited by:
Published on: January 01, 2024 18:42 PM
views 345  views

कुडाळ : बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आयोजित कै. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दरवर्षी प्रमाणे दि. ७ ते  १३ जानेवारी २०२४ या कालावधीत कुडाळ हायस्कुल कुडाळच्या सांस्कृतिक भवनमध्ये  बाबा वर्दम रंगमंचांवर हा नाट्य महोत्सव होणार आहे. यंदाचे नाट्य महोत्सवाचे २६ वे वर्ष असून  दि.  ७ जानेवारीला सायंकाळी ८.३० वाजता नाट्य महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. यावर्षी नाट्य रसिकांच्या आग्रहास्तव नाटकाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.  दररोज रात्री ९.१५ वाजता नाटक सुरु होणार आहे. या नाट्यमहोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे कार्यवाह केदार सामंत यांनी केले आहे. 

बाबा वर्दम थिएटर्स, ही कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील हौशी कलाकारांची नाटयसंस्था, कुडाळ येथील कै. बाबा वर्दम, कै. वामनराव पाटणकर, कै. शंकरभाई वर्दम, कै. एकनाथजी ठाकूर, कै. प्रकाश पाटणकर यांच्या प्रेरणेने व प्रतिभावंत दिग्दर्शक श्री. चंदू शिरसाट व विद्यमान अध्यक्ष तथा ज्येष्ठ रंगभूषाकार श्री. विलास कुडाळकर व सौ. वर्षा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ५२ वर्षे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रस्थानी आहे. रंगभूषामहर्षी कै. बाबा वर्दम यांच्या प्रेरणेने ही नाटयसंस्था सुरू झाली.

सन १९९९ पासून बाबा वर्दम थिएटर्स, कै. बाबा वर्दम यांचे नांवे 'कै. बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धा' आयोजित करण्यात येत होती. सन २०१५ पासून संस्थेने स्पर्धेचे स्वरुप बदलून नाट्यमहोत्सव सुरु करण्यात आला. या उपक्रमाचे हे २६ वे वर्ष असून यावर्षी राज्यभरातील नामवंत संघांची ७ उत्तम नाटके या नाट्यमहोत्सवात सादर होणार आहेत.

यावर्षी हा नाट्यमहोत्सव दि. ७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे २६वे वर्ष असून या महोत्सवाने महाराष्ट्रभर स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. कुडाळचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या या महोत्सवाचे उत्तम व्यवस्थापन हे खास वैशिष्ट्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती झाली असून, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ही या महोत्सवाची आणखी एक जमेची बाजू आहे. गेल्या २६ वर्षात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा येथील नामवंत नाट्यसंघांनी या स्पर्धेत आपली नाटके सादर केली आहेत. यावर्षीही पुणे, मुंबई, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर येथील नामवंत संघांची नाटके पहाण्याची सुवर्णसंधी कडाळच्या रसिकांना प्राप्त झाली आहे.

यावर्षी रविवार  ७ जानेवारीला मेरीड इंडिया कोल्हापूर यांचे 'स्पायडरमॅन' (लेखक-दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक), सोमवार दि. ८ जानेवारी रोजी लोकरंगभूमी, सांगली निर्मित 'ओयासिस'. (लेखक-दिग्दर्शक इरफान मुजावर), मंगळवार दि. ९ जानेवारी रोजी श्रीरंग, रत्नागिरी निर्मित 'तथास्तु' (लेखक राजश्री साने, दिग्दर्शक भाग्येश खरे), बुधवार दि. १० जानेवारी रोजी प्रवेश मुंबई निर्मित 'धनंजय माने इथे राहतात का ?' (लेखक रुपाली पवार, दिग्दर्शक - नम्रता काळसेकर), गुरुवार दि. ११ जानेवारी रोजी स्वरगंध पुणे निर्मित 'तप्तपदी' (लेखक निशांत तेंडोलकर, दिगदर्शक माधव जोगळेकर), शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे निर्मित ' सवाल अंधाराचा' (लेखक प्र. ल. मयेकर, दिगदर्शक आशुतोष नेर्लेकर), शनिवार दि. १३ जानेवारी रोजी नाट्यमल्हार, अहमदनगर निर्मित 'बैदा' (लेखक दिगदर्शक संदीप दंडवते) हि नाटके सादर होणार आहेत. नाटक रोज रात्री ठीक ९.१५ वाजता सुरु होणार आहेत.