
कुडाळ : पावसाळा जवळ असल्याने प्रशासकीय कामानाही वेग आला आहे. पावसाळ्यात कुडाळ शहरात येणारी पूरस्थिती लक्षात घेऊन नालेसफाईसाठी कुडाळ नगपंचायत सज्ज झाली आहे. कुडाळ नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील नाल्याची साफसफाई करण्याच्या कामाला वेग आला असून काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने रविवारपासून नाले साफसफाईचे करण्याचे काम हाती घेतले आहे.
कुडाळ शहरात अनेक ठिकाणी नाले आहेत. या नाल्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. नाल्यामध्ये गाळ साचल्यामुळे नाल्याची खोली कमी होते. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यांमधून वाहणारे पावसाचे पाणी बाहेर आजूबाजूच्या परिसरात लोकवस्तीत शिरते. त्याचा त्रास नागरिकांना होतो. पुराच्या पाण्यामुळे नुकसानही होते. दरवर्षी पासाळ्यात नागरिकांना होणाऱ्या पुराच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच न. पं. प्रशासन सतर्क झाले आहे.
कुडाळ शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होत असते. पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण झाली की नागरिकांना स्थलांतरीत व्हावे लागते. पुराच्या पाण्यामुळे जमिनीचीही धूप होऊन शेतीचेही नुकसान होते. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला न. पं. प्रशासन नाल्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेते. त्यामुळे पावसाळ्यात शहरात पुरस्थिती निर्माण होण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. शहरातील लक्ष्मीवाडी, तुपटवाडी, नाबरवाडी, आंबेडकरनगर, कुंभारवाडी, सांगिर्डेवाडी या ठिकाणच्या नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. जेसीबी व ट्रक्टरच्या सहाय्याने नाल्यातील गाळ काढला जात आहे. जेसीबीच्या सहाय्याने नाल्यांची खोली करून रुंद केले जात आहे. त्यामुळे पावसाचे पाणी न अडता पटकण वाहून जाण्यासाठी मदत होणार आहे. तसेच नाल्यातील साफसफाई केली जात आहे.