
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ चा एकूण १४४१ कामांचा ८८ कोटी २४ लाख २२ हजार रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागामार्फत सन २०२६-२७ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विकास कामे प्रस्तावित केली आहेत. त्यासाठी प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये ० ते १०० हेक्टर लघू पाटबंधारे योजनेच्या १९६ कामांसाठी ३४ कोटी ७३ लाख ९८ हजार रुपये अपेक्षित आहेत. तर ० ते १०० हेक्टर क्षमतेचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे या २५४ कामांसाठी ४४ कोटी ६५ लाख ४४ हजार रुपये अपेक्षित आहेत. तसेच ० ते १०० हेक्टर क्षमतेच्या पाटबंधारे योजनांचे सर्वेक्षण करणे या ९९१ कामांसाठी ८ कोटी ८४ लाख ८० हजार एवढा निधी अपेक्षित आहे. असा एकूण १४४१ कामासाठी ८८ कोटी २४ लाख २२ हजार रुपये खर्चाचा प्रारूप आराखडा जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाने तयार केला असून या आराखड्याला मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
या आराखड्याला मंजुरी मिळून जास्तीत जास्त निधी मिळाल्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लघू पाटबंधारे योजनेची कामे होणार आहेत. जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागणार आहे.










