
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मौजे कुडासे या गावाच्या तिलारी नदीपात्राने विभाजन करून वानोशी या नवीन स्वतंत्र महसूली गाव निर्माण करण्याची प्रारूप अधिसूचना रद्द करण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग अनिल पाटील यांनी जारी केले आहे. त्यामुळे कुडासे गावात विभाजनाला विरोध करणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर विभाजनाची मागणी करणाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले की, दोडामार्ग तालुक्यातील मौजे कुडासे या गावाचे नदीपात्रामुळे दोन स्वतंत्र महसूली गावात विभाजन करून नविन वानोशी हे महसुली गाव निर्माण करणेबाबत अधिसूचनेद्वारे प्रारूप अधिसूचना प्रसिध्द करणेत आलेली होती. सदर प्रारूप अधिसूचनेबाबत जनतेकडून गाव विभाजनात विरोध असलेबाबत मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झाले आहेत. त्यानुषंगाने सदर हरकतीच्या अनुषंगाने तहसिलदार दोडामार्ग यांनी दि. ०८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन संबंधीत ग्रामस्थांचा समूह जाब-जबाब व पंचयादीसह सविस्तर अहवाल उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी यांचेमार्फत या कार्यालयास सादर केलेला आहे.
प्रारूप अधिसूचनेबाबत मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या हरकती तसेच तहसिलदार दोडामार्ग व उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी यांचेकडील अभिप्राय विचारात घेता मौजे कुडासे येथील तिलारी नदीवरील मोठा पूल (ब्रिज) झाला असल्या कारणास्तव ग्रामपंचायत कार्यालयापासून गावातील इतर ठिकाणी वाडीवर जाण्या-येण्यासाठी सुमारे ५ किमी. अंतर लागत आहे. त्यामुळे कुडासे गाव विभाजन करून नविन 'वानोशी हे महसुली गाव निर्माण करणेची आवश्यकता नाही. त्यामुळे संदर्भीय दि.११ सप्टेंबर २०१९ रोजीची प्रारूप अधिसूचना रद्द करणेत येत आहे असे जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या पत्राची प्रत उपविभागीय अधिकारी सावंतवाडी, तहसीलदार दोडामार्ग, विभागीय आयुक्त कोंकण विभाग, ग्रामपंचायत कार्यालय कुडासे यांना माहितीसाठी पाठविण्यात आले आहे.