
पुणे : बीड येथील साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘एकविसाव्या शतकारंभीचे बालसाहित्य’ या समीक्षा ग्रंथास लीलावती भागवत राज्यस्तरीय पुरस्कार पुणे येथे दि. २ ऑगस्ट रोजी ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
वाचन ही उन्नत मानवी संस्कृती आहे. चारित्र्यवान पिढीसाठी बालवाचक घडविणे गरजेचे आहे. वाचनातून मुलांची जिज्ञासा आणि आकलन वाढते तर लोकशाही टिकविण्याचे कार्य सजग नागरिक करत असतात आणि वाचन सजग नागरिक निर्माण करते असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी यावेळी बोलताना केले. मराठी बाल साहित्यातील उत्कृष्ट निर्मितीसाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
माॅडर्न महाविद्यालय येथे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू‚ कार्यवाह अनिल कुलकर्णी‚ प्रसाद भडसावळे‚ प्राचार्य राजेंद्र झुंजारराव, संजय ऐलवाड‚ सचिन बेंडभर, राजेंद्र जेधे, तात्यासाहेब भराटे, संजीवनी जाधव, राहुल काशिद, ऋषिकेश जाधव, ओंकार जेधे यांचेसह राज्यातील लेखक‚ प्रकाशक यांची उपस्थिती होती.