डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे महत्वाची जबाबदारी

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 23, 2023 17:10 PM
views 357  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर होत असलेल्या नौदल दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणाऱ्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अतीमहनिय व्यक्तींच्या आरोग्याची जबाबदारी शासनाने सिंधुदुर्ग सुपुत्राकडे सोपविली आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. 

४ डिसेंबर हा नौसेना दिन यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. १ ते ४ डिसेंबर या कालावधीत नौसेना दिवस साजरा केला जाणार आहे. यासाठी ४ डिसेंबर रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य अती महनीय मान्यवर येणार आहेत. या मान्यवरांच्या आरोग्य विषयक बाबींकडे विशेष लक्ष ठेवण्याची आणि आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देण्याची महत्वाची जबाबदारी शासनाने जिल्ह्याचे सुपुत्र आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे सोपविली आहे. महनीय व्यक्तींच्या दौऱ्याच्या कालावधीत आरोग्य विषय बाबींकडे नोडल अधिकारी म्हणून ते काम पाहणार आहेत. यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले आहे.

मालवण ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह आरोग्य उपसंचालक कोल्हापूर डॉ. प्रेमचंद कांबळे हे देखील उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात डीन सारखे पद असतानाही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडं ही जबाबदारी दिल्याने शासनही मेडिकल कॉलेजच्या डीन यांच्या कामकाजाबाबत समाधानी नसल्याचे समोर येत आहे.

१५ मेडिकल टीम असणार कार्यरत

नौसेना दिवस निमित्त येणाऱ्या महनीय व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी १५ मेडिकल टीम तयार करण्यात येणार आहेत. या टीम मध्ये तज्ञ डॉक्टर, स्पेशालिस्ट रुग्णवाहिका, स्टाफ आदींचा समावेश असणार आहेत. या टीम हेलिपॅड, सेफ हाऊस आदी ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. या १५ मेडिकल टीम मध्ये १५० जणांचा स्टाफ असणार आहे.