
सावंतवाडी : देवदासी व्यवस्थेविरुद्ध दशकांपासून चाललेला संघर्ष आणि मोहीम अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होती, असे प्रतिपादन विमान संघटना, कर्नाटकचे अध्यक्ष ऍड. बी. एल, पाटील यांनी केले. सिंधुदुर्गातील मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी लिहिलेल्या ‘अर्जमधले दिवस’ या मराठी पुस्तकचे कन्नड भाषांतर ‘एआरझेड डोलागीना दिनागलू’ प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कर्नाटक विद्यावर्धक संघ, धारवाड यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.डॉ. संजीव कुलकर्णी यांनी ‘एआरझेड डोलागीना दिनागलू’ या शीर्षकाने केलेले कन्नड भाषांतर खूप चांगले आहे आणि ते सर्व कन्नडवासीयांनी वाचले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या संघर्षातून चांगली फलनिष्पत्ती झाली आहे. कारण अनेक देवदासी महिला या अमानवी परंपरेतून बाहेर पडल्या आहेत आणि देवदासींच्या मुलांना शिक्षणाच्या प्रकल्पामुळे त्यांना खूप मदत झाली आहे. त्यांना स्वतसाठी चांगले करिअर घडवता आले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
वास्को येथील अन्यायरहित जिंदगी (अर्ज) फाऊंडेशनचे संचालक अरुण पांडे म्हणाले की, गेल्या तीन दशकांपासूनच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे गोव्यात तरुण मुलींना देवदासी पद्धतीत प्रवेश मिळणे थांबले आहे. परंतु, आजही वेश्या व्यवसायाचे दुष्कर्म वेगवेगळ्या स्वरुपात सुरू आहे आणि हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे. लेखक डॉ. पाटकर म्हणाले की, अनेक लोक वेश्या व्यवसाय हा जगातील सर्वात जुना व्यवसाय असल्याचे मानतात. परंतु प्रत्यक्षात वेश्या व्यवसाय हा शोषणाचा सर्वात जुना प्रकार आहे. आजही कर्नाटकातील मोठया संख्येने तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. सर्व स्तरातील सुशिक्षित आणि सामाजिक दृष्ट्या जागरूक लोकांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून ही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यल्लप्पा आणि शेखर यांनी त्यांचे अनुभव सांगितले. ते दलित कुटुंबातील आहेत आणि वास्कोमधील वेश्या व्यवसायाच्या अमानवी प्रथेच्या परिघात वाढले आहेत. अर्ज फाऊंडेशनच्या टीमच्या प्रभावी व्याख्यानांमुळे त्यांना आता संपूर्ण समस्येची जाणीव झाली आहे. ते आता कर्नाटक, गोवा आणि इतर राज्यांमधील जागरुकता कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत.
डॉ. संजीव कुलकर्णी यांनी अनुवादाविषयी सांगितले की, मराठीतील पुस्तक वाचल्यानंतर त्यांना वाटले की ते कन्नडमध्ये भाषांतरित करणे आणि ते कन्नड वाचकांसाठी उपलब्ध करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. देवदासींची ही परंपरा केवळ दलित महिलांवर अन्याय नाही, तर धर्मावरही अन्याय आहे. हे पुस्तक कन्नड वाचकांमध्ये निरोगी संवाद आणि चर्चा निर्माण करण्यास मदत करेल. बेळगाव आणि विजापूर जिह्यातील अनेक गावांना त्यांच्या नाटकांच्या आणि गाण्यांच्या मदतीने दौरा करून ग्रामीण लोकांना देवदासी व्यवस्था कशी अमानवी आणि शोषणकारी आहे, याबाबत प्रबोधनाच्या आठवणी विश्वेश्वरी हिरेमठ यांनी सांगितल्या. पाहुण्यांचा परिचय कर्नाटक विद्यावर्धक संघाचे मुख्य सचिव शंकर हलगठी यांनी करून दिला.










