
सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या श्री पंचम खेमराज स्वायत्त महाविद्यालयाने ज्येष्ठ साहित्यिक, डॉ. महेश केळुसकर यांच्या 'दशावतार' या संशोधन ग्रंथातील 'मयासुरवध' या आख्यान संहितेचा एस.वाय.बी.ए. (सत्र ४) मराठी अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने १० वर्षांसाठी स्वायत्तता प्रदान केलेल्या या महाविद्यालयाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या ९ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला.
डॉ. महेश केळुसकर सिंधुदुर्गचे ज्येष्ठ साहित्यिक असून त्यांच्या या संशोधनपर कार्याला अभ्यासक्रमात स्थान मिळाल्याने कोकणातील पारंपरिक लोककला 'दशावतार' नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. कोकण प्रदेश केवळ निसर्ग सौंदर्यासाठीच नव्हे, तर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळखीसाठीही प्रसिद्ध आहे. दशावतार ही कोकणातील एक महत्त्वाची पारंपरिक लोककला असून, 'मयासुरवध' आख्यान संहितेच्या समावेशामुळे विद्यार्थ्यांना या कलेची सखोल माहिती आणि तिचे महत्त्व समजून घेता येईल.
या समावेशासाठी डॉ. महेश केळुसकर यांच्या परवानगीची विनंती श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने केली आहे. ही कलाकृती कोकणातील तसेच संबंधित विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने व्यक्त केली आहे.