
सावंतवाडी : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे मतदान जनजागृती मोहिम राबविण्यात आली आहे. सर्वच नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये ही जनजागृती करण्यात येणार आहे. स्वतः जिल्हाधिकारी या जनजागृती फेरीमध्ये सामील झाल्या होत्या ही चांगली गोष्ट आहे. निवडणूका ह्या लोकशाहीचा जागर आहेत आणि मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचे आद्य कर्तव्य आहे हे निश्चित असं मत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.
पण, निवडणूका स्वच्छ पारदर्शक आणि निरपेक्ष असतील तर याच सार्थक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका यावेळी पेपर बॅलटच्या आधारे घेतल्या असत्या तर हा जागर हा लोकशाहीचा उत्सव खरंच मोठा झाला असता.
पण यावेळी ईव्हीएम बरोबर असणाऱ्या VVPAT ह्या मतदाराला त्यांचं मत बटण दाबल्यावर नक्की कोणाला दिलं गेलं आहे हे कागदाच्या चिटोऱ्यावर कळण्याची मुभा देखील काढून टाकण्यात आली आहे. "बटण दाबा आणि गप्प बसा" असा निवडणूक आयोगाचा हा नवा आदेश आहे. सरतेशेवटी कुठलेही बटण दाबले तरीही निकाल काय लागणार हे जनतेला माहिती आहे त्याची खमंग चर्चा देखील जनतेमध्ये सुरू आहे असा टोला डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी हाणला आहे.










