
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी अधिकाऱ्यांकडून रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यास अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार रवीवारी घडला होता. संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी रक्तपेढी कर्मचारी वर्गाची तातडीची बैठक घेत कर्मचारी वर्गाला समज दिली.
डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी रक्तदाते, रूग्णांचे नातेवाईक यांना शिष्टाचार राखत वागणूक देण्याची समज दिली. रक्तदाते सामाजिक भान राखत रक्तदान करतात त्यामुळे त्यांना योग्य वागणूक द्यावी. रूग्णालयात आलेला रक्तदाता पुन्हा जाईपर्यंत त्यांना चांगली सेवा देण ही आपली जबाबदारी आहे. त्यात कोणतीही हयगय होऊ नये. घडलेल्या प्रकाराबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो असं वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे म्हणाले.
यापुढे अशा घटना घडणार नाहीत, रक्तदात्यांचा, रूग्णांच्या नातेवाईकांचा सन्मानच राखला जाईल असा शब्द युवा रक्तदाता संघटनेला त्यांनी दिला. याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. पांडुरंग वजराठकर, डॉ. गिरीश चौगुले, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, रक्तपेढीचे डॉ. पटेल, प्रशांत सातार्डेकर, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अनिल खाडे, संजय धोंड, युवा रक्तदाता संघटनेचे अर्चित पोकळे, मेहर पडते, देवेश पडते, राजू धारपवार, प्रथमेश प्रभू, राघवेंद्र चितारी, सुरज मठकर आदी उपस्थित होते.