
कुडाळ : नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले नाही हे मान्य आहे. परंतु, काँग्रेसमध्ये मरगळ आली असून इंडिया आघाडीला खिळ बसली आहे अशी चर्चा सुरू आहे. पण, असे नसून २०२४ मध्ये मोदी सरकार कोसळणार अस वक्तव्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत केले. तर कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार असून येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी अभिवादन सभा महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. मुणगेकर यांनी दिली
२४ पक्षांच्या आघाडीमध्ये छोट्या कुरघोड्या होत असतात. २०२४ मध्ये मोदी सरकारचा पराभव अटळ आहे ही काळ्या दगडावरील रेख असल्याचेही ते म्हणाले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग तयार झाला हे चांगले आहे. मात्र, समृद्धीबद्दल जी तत्परता दाखवण्यात आली ती मुंबई-गोवा महामार्गाबाबत दाखवण्यात आली नाही. आता कोकणातून सागरी महामार्ग काढण्याची तयारी सुरू आहे. एकंदरीत, कोकणचा विकास हा केमिकल झोन म्हणून सुरू आहे. १९६० पासून कोकणाकडे नेहमी दुर्लक्ष होत राहिले. त्याला येथील राजकीय अकार्यक्षम नेतृत्व जबाबदार असल्याची टीका डॉ. मुणगेकर त्यांनी केली. पुढील वर्षी १४ हजार ५०० शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. याबाबत आजपर्यंत विरोधी किंवा सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने आवाज उठविलेला नाही. तरी कोकणात क्रेडिट घेण्यावरूनच विकास थांबला अशी ही टीका डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडू असे राज्य सरकारने सांगितले आहे. मात्र, आजचे मरण सरकारने पुढे अधिवेशनापर्यंत ढकलले आहे अशी टीका अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सरकारची इच्छा नाही. ज्याप्रमाणे मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण देऊ असे गाजर दाखवण्यात आले आहे. त्याच पद्धतीने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणी केली जाईल असे गाजर राज्य सरकारने दाखविले आहे.