डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'कृषि स्वावलंबन'चा लाभ घेण्याचं आवाहन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 24, 2025 20:19 PM
views 32  views

देवगड : देवगड तालुक्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांनी शासनाकडून सन 2016/17 पासून राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देवगड तालुका पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी केले आहे. 

सन 2016/17 पासुन शासन बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन जमिनीतील ओलावा टिकवुन ठेवण्याच्या दृष्टीकोनातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यासाठी राबवत आहे. त्याअनुषंगाने या योजनेचा लाभ देवगड तालुक्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांनी घ्यावा. 

या योजनेमध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यासाठी नविन विहीरीसाठी चार लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये, इनवेल बोअरींगसाठी   40  हजार रुपये, पंपसंच 40000 हजार रुपये, वीजजोडणीसाठी 20 हजार रुपये, तुषार व ठिबक सिंचनासाठी  97  हजार रुपये , एचडीपीई/ पीव्हीसी पाईप 50000/-, बैलचलित/ ट्रॅक्टरचलित यंत्रसामुग्री 50000/- व परसबाग 5000/-अशी अनुदानाची मर्यादा राहणार आहे. 

लाभार्थी पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे : लाभार्थी हा अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकरी असला पाहीजे. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहीजे. शेतकऱ्याकडे त्याच्या स्वताच्या नावे किमान 0.40 हेक्टर ते कमाल 6.00 हेक्टर जमीन असली पाहीजे. नविन विहीरीव्यतीरिक्त इतर बाबींचा लाभ घेणेसाठी किमान 0.20 हेक्टर जमीन आवश्यक आहे. सामुहीक शेतजमीन किमान 0.40 हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नविन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल. दारीद्रयरेषेखालिल लाभार्थींना कमाल 6.00 हेक्टर मर्यादेची अट लागू असणार नाही. तसेच उत्पन्नाच्या दाखल्याची अटही सर्व अर्जदारांना लागू राहणार नाही.

शेतकऱ्याच्या नावे जमिनधारणेचा 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर खाते आधारकार्डशी संल्गन असणे आवश्यक आहे. दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्रित जमिन किमान 0.40 हे असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार आहे.

सदर योजनेचा लाभ ज्या पात्र अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांना घ्यावयाचा आहे त्यांनी संकेतस्थळावर (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin ) जाऊन शेतकरी योजना हा पर्याय निवडावा व आधार क्रमांक  संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. 

शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) असल्याशिवाय अर्ज सादर करता येत नसलेने अर्जदारांकडे शेतकरी ओळख क्रमांक असणे अत्यावश्यक आहे. अर्ज ऑनलाईन भरताना शेतकऱ्यांनी अद्ययावत सातबारा, 8अ, आधार, जातीचा दाखला,बॅक पासबुक प्रत व आधार लिंक केलेला मोबाईल सोबत ठेवावा.

ऑनलाईन अर्ज भरुन ग्रामसभेच्या शिफारसीने आवश्यक कागदपत्रासह त्याची प्रत गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचेकडे सादर करावयाचा आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे शेतकऱ्याने स्वयंसाक्षांकित करणे आवश्यक आहे. परिपुर्ण प्रस्ताव सादर केलेल्या लाभार्थींची निवड जिल्हा परिषद स्तरावर जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत मंजुरी देण्यात येणार आहे. वैयक्तीक लाभार्थी निवडताना महिला व अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असुन ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारातुन प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पध्दतीने ऑनलाईन लाभार्थींची निवड करणेत येणार आहे. अुनदानाची रक्कम थेट हस्तांतरण पध्दतीने लाभार्थीच्या आधार जोडणी केलेल्या बँक खात्यावर जमा करणेत येणार आहे.

या योजनेचा लाभ देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन देवगड तालुका पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी केले आहे.